Imposter Syndrome | काय आहे ‘इम्पोस्टर सिंड्रोम’? ज्याचा शिकार झाला होता विराट कोहली  
विश्वसंचार

Imposter Syndrome | काय आहे ‘इम्पोस्टर सिंड्रोम’? ज्याचा शिकार झाला होता विराट कोहली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या करिअरबाबत एक भावनिक खुलासा केला आहे. आपण प्रदीर्घ काळ ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ या समस्येचा सामना करत होतो, असे विराटने म्हटले आहे. विराट कोहलीने सांगितले की, कर्णधारपदाच्या काळात तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकला होता. या काळात तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ‘ड्रेन’ झाला होता आणि क्रिकेट खेळण्याचा खरा आनंद कुठे तरी नाहीसा झाला होता. विराटच्या या खुलाशानंतर हा ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ नक्की काय आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. याविषयी तज्ज्ञांचे काय मत आहे, ते जाणून घेऊया.

फोर्टिस हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत बंगा यांच्या मते, इम्पोस्टर सिंड्रोम ही एक मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्ती यशस्वी झाल्यानंतरही स्वतःला ‘फ्रॉड’ किंवा तोतया समजते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा कोणताही आजार नसून ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये माणसाला वाटते की आपल्याला मिळालेले यश केवळ एक योगायोग आहे. या स्थितीत व्यक्ती सतत स्वतःवर संशय घेते. माणसाचे स्वतःचेच मन त्याला आपण कोणाची तरी फसवणूक करत आहोत अशी जाणीव करून देते. या स्थितीत लोक स्वतःच्या क्षमतेला कमी लेखतात. विशेष म्हणजे केवळ विराट कोहलीच नाही, तर अल्बर्ट आईन्स्टाईन आणि टॉम हँक्स सारख्या महान व्यक्तीही त्यांच्या आयुष्यात या मानसिक परिस्थितीतून गेल्या आहेत.

इम्पोस्टर सिंड्रोमची लक्षणे :

उत्कृष्ट काम करणे; पण त्याचे श्रेय स्वतःकडे न घेणे.

अपयशाची सतत भीती वाटणे.

स्वतःची इतरांशी सतत तुलना करणे.

प्रत्येक वेळी गरजेपेक्षा जास्त मेहनत करणे.

आत्मविश्वासाची कमालीची कमतरता असणे.

स्वतःबद्दल सतत नकारात्मक विचार किंवा मूल्यमापन करणे.

प्रमाणाबाहेर काम करून स्वतःला थकवणे.

मोठे यश मिळाल्यानंतरही त्याचा स्वीकार न करता ते नाकारणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT