वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रसिद्ध ‘यलोस्टोन सुपरव्होल्कानो’ नक्की कशामुळे धगधगत आहे, याबाबत शास्त्रज्ञांनी एक खळबळजनक दावा केला आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांना असे वाटत होते की, जमिनीच्या खोलवर असलेल्या शिलारसाच्या (मॅग्मा) साठ्यामुळे हा ज्वालामुखी सक्रिय आहे. मात्र, ताज्या संशोधनानुसार, यलोस्टोनची ज्वालामुखी क्रिया जमिनीखालील मॅग्माच्या खोल विहिरीमुळे नसून, पृथ्वीच्या कवचातील बदलांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.
‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, पृथ्वीच्या थरांच्या हालचालींमुळे यलोस्टोनखालील शिलारसाचे साठे गरम होऊ शकतात. यासाठी जमिनीच्या खोल थरातून उष्णता येण्याची (मँटल प्लम) गरज नाही. चिनी अकादमी ऑफ सायन्सेसमधील भूगर्भशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक लिजुन लिऊ यांनी सांगितले की, ‘आमच्या कामामुळे मॅग्मा प्लंबिंग सिस्टिम कशा प्रकारे काम करते, याबद्दलची समज बदलली आहे. भविष्यातील ज्वालामुखी उद्रेकाच्या मॉडेल्समध्ये आता या नवीन माहितीचा विचार करावा लागेल.’ गेल्या 21 लाख वर्षांत यलोस्टोनमध्ये तीन मोठे उद्रेक झाले आहेत. सर्वात अलीकडचा उद्रेक 6,31,000 वर्षांपूर्वी झाला होता.
शेवटच्या महाउद्रेकामुळे यलोस्टोन ‘कॅल्डेरा’ तयार झाला, जो सुमारे 50 किलोमीटर (30 मैल) रुंद आहे. कॅल्डेरा म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जमिनीवर तयार झालेला वाडग्यासारखा मोठा खड्डा. यलोस्टोन परिसरातील पृथ्वीचे कवच तुलनेने पातळ असल्याने तो भाग ज्वालामुखी क्रियांचे केंद्र बनला आहे. यलोस्टोनच्या निर्मितीबाबत शास्त्रज्ञांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद आहेत :
1. मँटल प्लम थिअरी : काही शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या गाभ्यापासून उष्ण खडकांचा एक स्तंभ वर येतो, ज्यामुळे कवच गरम होते. 2. टेक्टोनिक थिअरी : नवीन संशोधनानुसार, हा केवळ पृथ्वीच्या कवचातील दाब आणि थरांच्या हालचालींचा परिणाम आहे. यलोस्टोन ज्वालामुखी वेधशाळेचे मुख्य भूकंपशास्त्रज्ञ जेमी फॅरेल (जे या संशोधनात सामील नव्हते) यांच्या मते, ‘या दोन्ही सिद्धांतांमुळे भविष्यात यलोस्टोन ज्वालामुखी यंत्रणा कशी वागेल, हे समजण्यास मोठी मदत होणार आहे.’ या नवीन शोधामुळे भविष्यातील ज्वालामुखी क्रियांचा अंदाज वर्तवणे आणि या महाकाय ज्वालामुखीचे स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आता शक्य होणार आहे.