‘ए 2 दूध’ म्हणजे काय? Pudhari File Photo
विश्वसंचार

‘ए 2 दूध’ म्हणजे काय?

‘ए 2 दूध’ हा प्रकारही हल्ली लोकांच्या चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सध्या अनेक लोक आहाराबाबत अधिक सजग बनले आहेत. त्यामध्ये काय काय समाविष्ट असावे याकडे अनेकांचा कटाक्ष असतो. ‘ए 2 दूध’ हा प्रकारही हल्ली लोकांच्या चर्चेत ऐकण्यास मिळतो. हे ‘ए 2 दूध’ म्हणजे काय, याची तुम्हाला माहिती आहे का? सोप्या भाषेत सांगायचे तर देशी गायीच्या पौष्टिक दुधालाच ‘ए 2 दूध’ म्हणतात. भारतीय गायीच्या प्रजातींमध्ये ए 2 एंझाइम म्हणजेच बीटा केसीन प्रथिने आढळून येते. हे एंझाइम शरीरातील ग्लुकोजवर नियंत्रण राखते आणि पचायला देखील हलके असते. देशी गायीच्या दुधाची खासियत काय असते ते जाणून घेऊया.

देशी गायीपासून मिळणारे दूध रसाळ असते. 1 कप दुधामध्ये 3 ते 4 टक्के मेद असते. या दुधात मानवी दुधाइतके प्रथिने असतात. त्यामुळे लहान मुलांसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम पोषक द्रव्य म्हणून ओळखले जाते. कॅज्युगेटेड लिनोलिइक अ‍ॅसिड नावाचा पदार्थ या दुधामध्ये उत्तम प्रमाणात आढळतो, ज्याने वजन संतुलित राहण्यासाठी मदत होते. ज्यांना कफ होतो, त्यांना हे दूध अतिशय उपयुक्त ठरते. ए 2 दूध केवळ एकाच देशी गायीच्या प्रजातीपासून मिळते का? याचं उत्तर आहे - नाही. भारतात गीर गायीचं दूध प्रसिद्ध आहे; परंतु ‘ए 2 दूध’ देणार्‍या आणखी प्रजाती आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर साहिवाल, राठी, थारपारकर बेलाही, कोकण कपिल, बद्री, कंकरेंज, लाल सिंधी यासारख्या प्रजातीच्या गायीचे दूधदेखील ‘ए 2 दूध’ आहे. या दुधात देखील तितकीच आरोग्यदायी पोषकतत्त्वं आहेत. त्यामुळे खरं तर भारतीयांनी देशी गायीचे दूध नियमितपणे आहारात समाविष्ट करायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT