वॉशिंग्टन : वैज्ञानिक गेल्या काही वर्षांपासून लघुग्रह, उल्कापिंड, मंगळ ग्रह आणि तरुण ताऱ्यांच्या सभोवतालच्या भागात जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या मूळ घटकांचा शोध घेत आहेत. आगामी अंतराळ मोहिमांचा मुख्य उद्देशही या घटकांची व्याप्ती शोधणे हाच आहे. पण आतापर्यंत अवकाशात नक्की किती घटक आढळले आहेत? जीवसष्टीचे मूळ घटक म्हणजे काय?
शास्त्रज्ञ अशा रेणूंचा शोध घेत आहेत जे पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या घटकांशी जुळतात. यामध्ये प्रथिने, आरएनए आणि पेशींच्या पटलांची निर्मिती करणारे मेदयुक्त रेणू म्हणजेच लिपिड्स यांचा समावेश होतो. अंतराळातून नमुने परत आणणाऱ्या मोहिमांमधून अनेक महत्त्वाचे घटक हाती आले आहेत. बेन्नू लघुग्रह : २०२३ मध्ये पृथ्वीवर आणलेल्या या लघुग्रहाच्या नमुन्यांमध्ये डीएनए आणि आरएनएचे सर्व ५ न्यूक्लिओबेस आढळले आहेत. यासोबतच सजीवांसाठी आवश्यक असलेल्या २० पैकी १४ ॲमिनो ॲसिड्सही यात सापडले आहेत. रियुगू लघुग्रह : बेन्नूचाच एक जुळा भाग मानल्या गेलेल्या रियुगूवरही सर्व ५ न्यूक्लिओबेस मिळाले आहेत, ज्यामध्ये आरएनए मध्ये आढळणाऱ्या ‘युरेसिल’चा समावेश आहे.
रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवकाशातील दूरवरच्या भागात या घटकांचा शोध घेतला जातो. खगोलशास्त्रज्ञ सापडलेल्या रेणूंची गुंतागुंत लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण करतात. यातील एका मोठ्या गटाला ‘कॉम्प्लेक्स ऑरगॅनिक मॉलिक्युल्स’ (COM) म्हटले जाते. हे कार्बनयुक्त रेणू असून त्यात सहा किंवा त्याहून अधिक अणू असतात. डेन्मार्कच्या आरहूस युनिव्हर्सिटीतील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व ॲस्ट्रोकेमिस्ट सरजिओ इओपोलो यांच्या मते, अवकाशात आतापर्यंत शोध लागलेल्या सुमारे ३५० विविध रेणूंपैकी जवळजवळ १८० रेणू ‘COM’ श्रेणीमध्ये येतात. ही व्याख्या एक व्यावहारिक सोय असून, गुंतागुंतीची अंतिम मर्यादा नाही. सर्वच COM हे जीवसृष्टीचे थेट घटक असतात असे नाही. मात्र, यातील एक उपगट म्हणजे ‘प्रीबायोटिक’ रेणू, ज्यांचा जीवसृष्टीच्या उत्पत्तीमध्ये महत्त्वाचा वाटा असावा असे मानले जाते.
इओपोलो यांच्यानुसार ‘‘प्रीबायोटिक रेणूची कोणतीही एकच विशिष्ट संरचनात्मक व्याख्या नाही. विविध शास्त्रज्ञ याचा अर्थ थोडा वेगवेगळ्या प्रकारे लावतात.’’ इओपोलो यांच्या व्याख्येनुसार, ‘प्रीबायोटिक घटक’ म्हणजे असा रेणू ज्याच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री आहे, जो आधीपासून जीवसृष्टी अस्तित्वात नसतानाही तयार होऊ शकतो व टिकू शकतो आणि ज्याची जीवसृष्टी तयार होण्याच्या प्रक्रियेतील भूमिका नोंदवलेली आहे. या व्याख्येचा विचार केल्यास, इओपोलो यांच्या अंदाजानुसार अवकाशात आतापर्यंत सुमारे ३० प्रीबायोटिक उमेदवार रेणू शोधण्यात यश आले आहे. अर्थात, ही संख्या नक्की किती असावी हे सीमा कुठे आखली जाते यावर अवलंबून आहे.