नवी दिल्ली : जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी बाहेरचे पदार्थ म्हणजे कोल्ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर खाणे बंद करतात तेव्हा तुमचे शरीर यापासून स्वत:ला डिटॉक्सिफाय करण्यास सुरुवात करते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. डोकेदुखी, चिडचीड आणि थकवा अशी लक्षणे कालांतराने कमी होऊ लागतात. इतकेच नाही, तर व्यक्तीची शारीरिक ऊर्जा पातळी वाढते, पचनक्रिया सुधारते, मूड चांगला राहतो, तुमची त्वचा मुलायम आणि सुंदर दिसू लागते. त्यात फळे, भाज्या आणि घरातील इतर खाद्यपदार्थ अधिक चवदार वाटू लागतात. त्यातील नैसर्गिक चवींमुळे तुमचे मन तृप्त होते. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि त्यामुळे निरोगी आणि अधिक संतुलित जीवनशैली जगता येते.
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बराच वेळ टिकण्यासााठी त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. हे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा पचनसंस्थेतील चांगले जीवाणू विस्थापित होतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. त्यामध्ये ट्रान्स फॅटस् आणि रिफाइंड साखरेसारखे दाहक घटकदेखील असतात. त्यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते आणि मुरुमांची समस्या जाणवते. अशाने त्वचेच्या आरोग्यावरही त्याला परिणाम दिसून येतो. तंतुमय आहारामुळे निरोगी पचनसंस्थेला चालना मिळते, तर पालेभाज्या, चरबीयुक्त मासे व सुका मेवा यांसारख्या दाहकविरोधी खाद्यपदार्थांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. निरोगी आहार, चांगली झोप यामुळे आरोग्यास दीर्घकालीन फायदे मिळतात, ज्यात लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह, हृदयरोग व विशिष्ट कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. पांढर्या तांदळाच्या जागी तुम्ही ब्राऊन राईस, सोडाऐवजी हर्बल चहा, रेग्युलर बटरऐवजी नट बटर, ग्रील्ड, बेक फूड आणि इतर अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता. तुम्ही केकसारखे गोड पदार्थ घरीच चांगले पदार्थ वापरून बनवू शकता. तसेच आईस्क्रीमच्या जागी तुम्ही फ्रोझन दही खाऊ शकता. त्याशिवाय घरच्या तयार केलेल्या सॅलडचा रोजच्या आहारात समावेश करणे हादेखील उत्तम आरोग्याचा भाग आहे. तसेच बाटलीबंद सोडा, कोल्ड ड्रिंक्सच्या जागी तुम्ही नैसर्गिक आरोग्यदायी कोकम सरबत, लिंबू पाणी असे घरच्या घरी बनणार्या पेयांचे सेवन करू शकता.