नवी दिल्ली : बोटं मोडण्याची सवय काही लोकांना असते. अर्थात, ती कुणाच्या नावाने बोटं मोडण्याची किंवा कुणाची आलाबला घेत बोटं मोडण्याचीच असते असे नाही! काहींना एक चाळा म्हणूनही हाताची किंवा पायाचीही बोटं मोडण्याची सवय असते. अशा लोकांना इतरांनी वारंवार रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही तुम्ही पाहिलं असेल. बोटं मोडत राहिल्यास सांधे दुखतील आणि संधिवाताची समस्या निर्माण होईल, अशाही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. बोटं मोडण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. यामुळे हाडे कमकुवत होतात, असे म्हणतात; पण हे खरे आहे का?
हात-पायांची बोटं मोडल्यानंतर किंवा शरीराचे सांधे मोडल्यास त्यातून येणारा आवाज हा हाडांच्या घर्षणामुळे किंवा कॉर्टिलेजच्या तुटण्यामुळे येत नाही, तर गॅसमुळे येतो. वर्ष 2015 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातील माहितीनुसार जेव्हा सांधे ताणले जातात तेव्हा त्यातील दाब अचानक कमी होतो. यामुळे सांध्यासाठी वंगणाप्रमाणे काम करणारे सायनोव्हियल द्रवपदार्थ जलदगतीने पसरत नाही आणि वायूने भरलेली पोकळी तयार होते. या प्रक्रियेस ट्रायबोन्यूक्लिएशन असे म्हणतात, ज्यामुळे हाड मोडल्यानंतर आवाज ऐकू येतो. बोटं मोडण्याबाबत अशी सामान्य समज आहे की, या सवयीमुळे संधिवाताची समस्या निर्माण होते; पण संशोधनामध्ये असेही काहीही आढळून आलेले नाही.
डोनाल्ड अनगर नावाच्या एका डॉक्टरने 50 वर्षे त्यांच्या डाव्या हाताची बोट मोडली; पण उजव्या हाताची बोट मोडणे टाळलं. वर्ष 2004 मध्ये त्यांना आढळले की, दोन्ही हातांमधील संधिवात किंवा सांध्याच्या समस्यांमध्ये कोणताही फरक नव्हता. तसे पाहता बोटं मोडण्याच्या सवयीचे कोणतेही नुकसान नाहीत; पण चुकीच्या पद्धतीने बोट मोडू नये, असेही संशोधनामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.