न्यूयॉर्क: मृत्यूनंतर मानवी शरीराचे नेमके काय होते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना जगातील लोकप्रिय शास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी एक विस्मयकारक सिद्धांत मांडला आहे. विज्ञानाच्या नियमांनुसार ऊर्जेचा कधीही नाश होत नाही, याच तत्त्वावर आधारित टायसन यांनी मृत्यूनंतरच्या प्रवासाचे दोन मार्ग सांगितले आहेत.
ऊर्जेचा अक्षय्य नियम आणि मानवी शरीर
टायसन यांच्या मते, आपण आयुष्यभर जे अन्न खातो आणि व्यायाम करतो, त्यातून आपल्या शरीरात रासायनिक ऊर्जा साठवली जाते. जेव्हा हृदय आणि मेंदू काम करणे थांबवतात, तेव्हाही ही ऊर्जा शरीरातील रेणूंमध्ये (मोलेक्युल्स ) तशीच असते. या ऊर्जेचे विसर्जन करण्याचे दोन मुख्य मार्ग टायसन यांनी स्पष्ट केले आहेत:
दफन (पृथ्वीला परत देणे) : टायसन यांनी स्वतःसाठी दफनविधीची निवड केली आहे. त्यांच्या मते, जेव्हा शरीर जमिनीत गाडले जाते, तेव्हा सूक्ष्मजीव आणि बॅक्टेरिया शरीरातील प्रथिनांचे आणि ऊर्जेचे विघटन करतात.फायदा: ज्याप्रमाणे आपण आयुष्यभर निसर्गातील वनस्पती आणि प्राण्यांचे सेवन करून ऊर्जा मिळवली, तीच ऊर्जा मृत्यूनंतर पुन्हा मातीला मिळते. हे निसर्गाच्या चक्राला पूर्ण करण्यासारखे आहे.
अंत्येष्टी/दहन ( ताऱ्यांचा प्रवास) : ज्यांचे दहन केले जाते, त्यांच्या शरीरातील ऊर्जा उष्णतेमध्ये रूपांतरित होते. ही इन्फ्रारेड ऊर्जा प्रकाशाच्या वेगाने अवकाशात प्रवास करते. टायसन म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले असेल आणि त्यांचे दहन केले गेले असेल, तर त्यांच्या शरीरातील किरणोत्सर्गी ऊर्जा आतापर्यंत आपल्या सर्वात जवळच्या 'अल्फा सेंटॉरी' या तारासमूहापर्यंत पोहोचली असेल. म्हणजे एका अर्थाने, तुम्ही मृत्यूनंतरही विश्वाचा भाग म्हणून ताऱ्यांमध्ये फिरत असता .
'ग्रीन बरियल'चा नवा कल
टायसन यांच्या या सिद्धांतामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी आधुनिक शवपेट्यांमुळे शरीर मातीत मिसळण्यास अडथळा येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता 'ग्रीन बरियल' (Green Burial) ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. यात कोणत्याही रसायनांशिवाय शरीर थेट जमिनीत पुरले जाते आणि त्यावर एखादे झाड लावले जाते. झाड वाढताना शरीरातील नायट्रोजन आणि फॉस्फरसचा खत म्हणून वापर करते.