Stop Drinking Tea Effects | महिनाभर चहा सोडल्यास शरीरात काय बदल घडतात?  
विश्वसंचार

Stop Drinking Tea Effects | महिनाभर चहा सोडल्यास शरीरात काय बदल घडतात?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात चहा हे केवळ एक पेय राहिलेले नसून ती लोकांची सवय आणि दिवसाच्या सुरुवातीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्या उठल्या चहा पिणे, ऑफिसमध्ये कामाच्या मधल्या ब्रेकदरम्यान चहा घेणे आणि संध्याकाळी मित्रांसोबत चहाचा आस्वाद घेणे हे जवळपास प्रत्येकाच्याच दिनचर्येत समाविष्ट असते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जर तुम्ही सलग ३० दिवस म्हणजेच एक महिन्यासाठी चहा पिणे पूर्णपणे बंद केले, तर तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होईल?

चहामध्ये असलेले कॅफिन आणि साखर यांचे जास्त प्रमाण झोप, पचनक्रिया आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. अनेकांना चहाशिवाय दिवसाची सुरुवात करणे अशक्य वाटते; परंतु तो सोडल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. चहामध्ये असलेले कॅफिन शरीरात उत्तेजक म्हणून काम करते, जे मेंदूला सतत सक्रिय ठेवते आणि झोप येण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावते. जेव्हा तुम्ही चहा पिणे बंद करता, तेव्हा शरीरातील कॅफिनचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो. यामुळे रात्री लवकर आणि गाढ झोप येण्यास मदत होते. चहा सोडल्यानंतर रात्री वारंवार झोप मोड होण्याची समस्याही बऱ्याच अंशी कमी होते.

जास्त चहा प्यायल्याने पोटात ॲसिडची निर्मिती वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास होतो. विशेषतः, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे पचनसंस्थेला हानी पोहोचवते. जेव्हा तुम्ही चहा सोडता, तेव्हा पोटातील ॲसिडचा समतोल सुधारतो आणि पचनक्रिया हळूहळू पूर्ववत होते. यामुळे पोट हलके आणि आरामदायी राहते. चहामध्ये ‘टॅनिन्स’ नावाचे घटक असतात, जे दातांवर डाग पाडतात आणि दात पिवळे पडण्यास कारणीभूत ठरतात. चहा पिणे बंद केल्यास दातांवर नवीन डाग पडणे थांबते. कॅफिनचे अतिसेवन शरीरात स्ट्रेस हार्मोन्स (ताण वाढवणारे संप्रेरक) वाढवू शकते, ज्यामुळे अनेकदा अस्वस्थता, चिंता आणि घबराट जाणवते. चहा सोडल्यानंतर मेंदू अधिक शांत राहतो आणि मूड स्विंग्स (स्वभावातील बदल) कमी होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT