पांडा बांबूशिवाय अन्य काय खातात? Pudhari File Photo
विश्वसंचार

पांडा बांबूशिवाय अन्य काय खातात?

पांडा दिवसातील सुमारे 16 तास केवळ हेच झाड कुरतडण्यात घालवतो

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : काळी-पांढरी लोकरसद़ृश फर, आळशी वागणूक तसेच बांबूचा आहार हा घटकही जायंट पांडाच्या (Ailuropoda melanoleuca) ओळखीचा मुख्य भाग मानला जातो. हे अत्यंत दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्राणी दररोज तब्बल 12 ते 38 किलो (26 ते 84 पौंड) बांबू खातो आणि दिवसातील सुमारे 16 तास केवळ हेच झाड कुरतडण्यात घालवतो. या अतिव्यसनी खाण्याच्या सवयींमुळे फेंग ली, चीन वेस्ट नॉर्मल युनिव्हर्सिटीचे संशोधक, पांडाला ‘बांबूचा फिरता श्रेडर’ असं संबोधतात; पण पांडा बांबूशिवाय काही खातो का?

बहुतेक वेळा उत्तर आहे ‘नाही’; मात्र काही दुर्मीळ अपवाद नोंदले गेले आहेत. फेंग ली यांच्या मते, चीनमधील क्विनलिंग पर्वत भागात काही वन्य पांडांनी टॅकिन (Budorcas taxicolor) या बकरीसारख्या जंगली प्राण्याची हाडं कुरतडल्याचे निरीक्षण झाले आहे. कधीकधी ते चायनीज बांबू रॅट (Rhizomys sinensis) या उंदरासारख्या प्राण्यावर हल्लाही करतात.

यू.के.मधील अ‍ॅबर्डीन विद्यापीठाचे प्राणीशास्त्रप्रमुख जॉन स्पीकमन सांगतात की, हे प्रसंग अपवादात्मक आणि संधीसाधू आहेत. उदाहरणार्थ, एका प्राणी संग्रहालयात पांडाने मोर पकडून खाल्ल्याचा फोटो ऑनलाईन दिसतो; पण हे अतिशय दुर्मीळ आहेत. हे दुर्मीळ मांसाहारी क्षण वगळता, पांडा मुख्यतः फक्त बांबूवर अवलंबून असतो. पण, हेच खरे आश्चर्य आहे, कारण संशोधन सांगते की, पांडा बांबूसाठी योग्य प्रकारे जैविकद़ृष्ट्या सुसज्ज नाही! पांडाच्या पोटाची रचना इतर मांसाहारी प्राण्यांसारखी आहे म्हणजेच त्यात गवतखाऊ प्राण्यांप्रमाणे पचनासाठी अनेक विभाग नसतात. शिवाय त्यांच्या पचनसंस्थेत असणारे जीवाणू (गट फ्लोरा) हे मांसाहारी प्राण्यांसारखे असतात, ते प्रथिने पचवतात; पण फायबरयुक्त वनस्पती फारशा पचवू शकत नाहीत.

त्यामुळे पांडाच्या विष्ठेत न पचलेला बांबू स्पष्टपणे दिसतो. ही विसंगती म्हणजेच पांडाच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील ‘हँगओव्हर’ आहे. जीवाश्म नोंदींवरून समजते की, प्राचीन काळातील पांडाच्या पूर्वजांनी मांस आणि वनस्पती दोन्ही खाल्ले होते. अंदाजे 7 दशलक्ष वर्षांपूर्वी, Ailurarctos नावाचा एक पूर्वज प्रजातीने बांबू खाणं सुरू केलं, यालाच ‘उम्निव्होर ते हर्बिव्होर’ या संक्रमणाचा आरंभ मानला जातो. फेंग ली सांगतात की, हे संक्रमण पर्यावरणीय बदलांमुळे वेगाने घडलं. त्या काळी अन्नस्रोत अचानक घटले आणि पांडाचे पूर्वज इतर मांसाहारी प्राण्यांशी स्पर्धा करू लागले. बांबूचा स्वाद घेतलेला Ailurarctos या पर्यावरणीय कोपर्‍यात तग धरू शकला. कारण, त्याने कमी स्पर्धा असलेल्या बांबूवर आधारित आहाराकडे वळणं सुरू केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT