हाँगकाँग : आजकाल सोशल मीडियावर एका खास प्रकारच्या बाहुल्यांची क्रेझ आहे, ज्यांचे नाव आहे ‘लाबुबू डॉल’ असे आहे. या बाहुल्या दिसायला गोंडस आहेत, पण त्याच वेळी त्यांचे स्वरूप थोडे भयानक आणि विचित्र असेही आहे. मोठे डोळे, टोकदार दात आणि वेगवेगळ्या रंग आणि डिझाइनसह, या बाहुल्यांनी लोकांचे मन जिंकले आहे, पण ही लाबुबू डॉल नेमकी काय आहे? आणि ती इतकी लोकप्रिय का झाली आहे? चला जाणून घेऊयात.
हाँगकाँगमधील कलाकार केसिंग लंग यांनी लाबुबू डॉलची सुरुवात केली. त्यांनी 2015 मध्ये ‘द मॉन्स्टर’ नावाची एक चित्र पुस्तक मालिका तयार केली. या पुस्तकात ‘लाबुबू’ नावाचे एक खास पात्र होते, या पात्राने नंतर या बाहुल्यांचे रूप धारण केले. केसिंग लंगने ते इतके खास बनवले की ते पाहिल्यानंतर लोकांना भीती आणि प्रेम दोन्ही जाणवते. लाबुबू डॉल्स खास ब्लाइंड बॉक्समध्ये विकल्या जातात. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही डॉल खरेदी करता तेव्हा तुमच्या बॉक्समध्ये कोणती डॉल येईल हे तुम्हाला माहिती नसते. ही एक ‘हटके ट्रिक’ आहे जी लोकांना पुन्हा पुन्हा ते खरेदी करण्यास उत्सुक ठेवते.
ही पद्धत या डॉलच्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण बनली. 2024 पासून लाबुबू डॉलची लोकप्रियता झपाट्याने वाढली. के-पॉप स्टार लिसाने तिचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा ही फॅशन जगभर पसरली. हॉलीवूड गायिका रिहाना, दुआ लिपा आणि बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ व अनन्या पांडे देखील या ट्रेंडमध्ये सामील झाल्या आहेत. या डॉल फक्त मुलांपुरत्या मर्यादित नाहीत तर मोठ्यांनाही त्या आवडू लागल्या आहेत. या डॉल्स चिनी कंपनी पॉप मार्टने बनवल्या आहेत. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ वांग निंग यांची संपत्ती या डॉलमुळे मुळे अनेक अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, वांग निंग यांची एकूण संपत्ती अंदाजे 18.7 अब्ज डॉलर्स आहे.