लंडन : मानवी इतिहासाच्या पानांवर एक धक्कादायक आणि तितकेच भयावह सत्य समोर आले आहे. आपले पूर्वज केवळ शिकारी नव्हते, तर ते नरभक्षकही होते आणि लहान मुलांचे मांस खात होते, असा खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे. उत्तर स्पेनमधील अटापुर्का येथील ग्रॅन डोलिना गुहेत पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सुमारे 8,50,000 वर्षे जुने एका लहान मुलाच्या मानेचे हाड सापडले आहे, ज्यावर कापल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. हा शोध मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासाला नवी दिशा देणारा ठरला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे हाड दोन ते चार वयोगटातील एका मुलाचे असून, त्याचा शिरच्छेद करून त्याला खाण्यात आले होते. हे अवशेष ‘होमो अँटेसेसर’ या मानवी प्रजातीचे आहेत, ज्यांना आधुनिक मानव (होमो सापियन्स) आणि निएंडरथल्स यांचा शेवटचा समान पूर्वज मानले जाते.
कॅटलान इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन पॅलेओईकॉलॉजी अँड सोशल इव्होल्यूशन या संस्थेचे पथक गेल्या तीन दशकांपासूनअटापुर्का येथील ग्रॅन डोलिना गुहेत उत्खनन करत आहे. या गुहेत आतापर्यंत सापडलेल्या एकूण मानवी हाडांपैकी जवळपास एक तृतीयांश हाडांवर कापल्याच्या खुणा आढळल्या आहेत, ज्यामुळे या प्राचीन मानवांमध्ये नरभक्षकाची प्रथा असल्याचे स्पष्ट होते.
ग्रॅन डोलिना उत्खननाच्या सहसंचालक डॉ. पाल्मिरा सलाडी यांनी सांगितले की, हे प्रकरण विशेषतः धक्कादायक आहे, केवळ मुलाच्या वयामुळेच नव्हे, तर त्याच्या हाडांवरील कापण्याच्या खुणांच्या अचूकतेमुळेही. मानेच्या हाडावर डोके शरीरापासून वेगळे करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी अचूकपणे वार केल्याच्या खुणा आहेत. इतर कोणत्याही शिकारीप्रमाणेच या मुलाच्या शरीराचे तुकडे केले गेले, याचा हा थेट पुरावा आहे. मुलाच्या मानेच्या हाडावरील खुणांवरून त्याचा शिरच्छेद केला गेला होता. याशिवाय, इतर प्रौढ व्यक्तींच्या हाडांवरून मांस खरवडून काढल्याच्या आणि हाडे मुद्दाम तोडल्याच्या खुणाही सापडल्या आहेत. होमो अँटेसेसर ही प्रजाती 12 लाख ते 8 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. ते आधुनिक मानवांपेक्षा उंचीने कमी आणि अधिक मजबूत होते. त्यांच्या मेंदूचा आकार आधुनिक मानवांपेक्षा (1350 लाक) थोडा कमी, म्हणजे 1000 ते 1150 लाकदरम्यान होता.
संशोधकांच्या मते, होमो अँटेसेसर आपल्याच प्रजातीच्या लोकांकडे अन्नाचा स्रोत म्हणून पाहत असावेत. याशिवाय, प्रादेशिक वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा शत्रू गटांना संपवण्यासाठीही ही प्रथा वापरली जात असावी. यापूर्वी केनियामध्ये 1.45 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या नरभक्षकाचे पुरावे सापडले होते. मात्र, इतक्या लहान मुलाला खाल्ल्याचा हा आतापर्यंतचा सर्वात जुना आणि स्पष्ट पुरावा मानला जात आहे. हा शोध केवळ मानवी पूर्वजांच्या क्रूरतेवरच प्रकाश टाकत नाही, तर त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचे आणि सामाजिक वर्तनाचे एक गडद चित्रही आपल्यासमोर उभे करतो. या गुहेतील उत्खननातून भविष्यात मानवी इतिहासाची आणखी कोणती रहस्ये उलगडणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.