टोकियो ः पृथ्वीच्या सुमारे तीन चतुर्थांश भागावर महासागर पसरलेले आहेत, त्यामुळे अंतराळातून पृथ्वी ही एक फिकट निळा बिंदू म्हणून दिसते. मात्र, ‘नेचर’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासानुसार, पृथ्वीचे महासागर पूर्वी हिरवे होते. याबाबतचा दावा जपानी संशोधकांनी केला आहे.
हिरवट महासागर असण्यामागे त्या काळातील समुद्रातील रासायनिक रचना आणि प्रकाश संश्लेषणाच्या उत्क्रांतीचा मोठा हात असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. पृथ्वीच्या इतिहासात banded iron formations (पट्टीदार लोहखनिज साठे) यांचा मोठा वाटा असल्याचे भूगोलशास्त्रात शिकवले जाते. हे खनिज साठे Archean आणि Paleoproterozoic युगांमध्ये म्हणजेच सुमारे 3.8 ते 1.8 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले होते. त्या काळी जीवन फक्त एकपेशीय जीवांपुरते मर्यादित होते आणि खंडावर केवळ राखाडी, तपकिरी आणि काळ्या रंगाचे खडक व गाळ होते. पावसामुळे खंडीय खडकांमधून लोहतत्त्व विरघळून समुद्रात पोहोचत असे.
याशिवाय समुद्रतळावरील ज्वालामुखीदेखील लोहतत्त्वाचे स्रोत होते. त्या काळात पृथ्वीच्या वातावरणात आणि महासागरात प्राणवायू नव्हता; पण सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळवणारे पहिले जीव तयार झाले होते. हे जीव ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत प्रकाश संश्लेषण करत असत (anaerobic photosynthesis) ज्यामुळे उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन तयार होऊ लागला. हा ऑक्सिजन समुद्रातील लोहतत्त्वाशी संलग्न होत असे. जेव्हा हे लोहतत्त्व संपले, तेव्हा उरलेला ऑक्सिजन वातावरणात मुक्त स्वरूपात दिसू लागला. यामुळेच पुढे " Great Oxidation Event" घडून आला. हा एक असा टप्पा ज्यामुळे पृथ्वीवर गुंतागुंतीच्या जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. या परिवर्तनाचा पुरावा पट्टीदार लोह साठ्यांमधील विविध रंगांच्या पट्ट्यांमध्ये आढळतो. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत साठलेले लोहतत्त्व आणि ऑक्सिजनमुळे तयार झालेले लालसर लोह. जपानी संशोधकांनी Iwo Jima या ज्वालामुखी बेटाजवळील पाण्याचा अभ्यास केला. तेथील पाण्याला हिरवट छटा आहे, कारण त्यामध्ये Fe( III) प्रकारचे ऑक्सिडाईज्ड लोह आहे. या हिरवट पाण्यात blue- green algae (नील-हिरव्या शैवाळी) भरभराटीने वाढतात. या नील-हिरव्या शैवाळींना खरेतर शैवाळ म्हणता येणार नाही, कारण त्या एकप्रकारच्या आद्य जीवजंतूंमध्ये गणल्या जातात. Archean युगात त्यांच्या पूर्वजांनी इतर अशा जीवांबरोबर उत्क्रांती केली होती, जे प्रकाश संश्लेषणासाठी पाण्याऐवजी फेरस लोहाचा ( Fe2+) वापर करत असत. यावरून त्या काळी समुद्रात लोहाचे प्रमाण खूप जास्त होते, असे सूचित होते. या संशोधनामुळे पृथ्वीच्या इतिहासातील सागरी जीवन, वातावरण आणि जैविक उत्क्रांतीबद्दल नव्या द़ृष्टिकोनातून विचार करण्याची दिशा मिळाली आहे.