Ancient Animal Fossils | ब्राझीलच्या सव्हानामध्ये उत्तर-क्रीटेशिअस काळातील ‘टाईम कॅप्सूल’  
विश्वसंचार

Ancient Animal Fossils | ब्राझीलच्या सव्हानामध्ये उत्तर-क्रीटेशिअस काळातील ‘टाईम कॅप्सूल’

कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे सुस्थितीमधील सापडले जीवाश्म

पुढारी वृत्तसेवा

ब्राझीलिया : अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनानंतर दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जैवविविधता असणाऱ्या ब्राझीलच्या ‘सेराडो’ या उष्णकटिबंधीय सव्हाना प्रदेशात एक अद्‌भुत खजिना गवसला आहे. ‘उबेराबा जिओपार्क’ नावाचा हा परिसर म्हणजे उत्तर-क्रीटेशिअस काळातील (सुमारे १० कोटी ५ लाख ते ६ कोटी ६० लाख वर्षांपूर्वीच्या) इतिहासाचे जणू एक ‘टाईम कॅप्सूल’ ठरत आहे. ‘युनेस्को’च्या माहितीनुसार, या जिओपार्क क्षेत्रात पक्षीव्यतिरिक्त असलेल्या डायनासोरच्या शेवटच्या काळातील मुबलक आणि अत्यंत सुस्थितीत असलेले अवशेष आढळले आहेत. यामुळेच या भागाला पोर्तुगीज भाषेत ‘टेरा दोस गिगांतेस’ म्हणजेच ‘दैत्यांची भूमी’ हे नाव पडले आहे.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या जिओपार्कच्या हद्दीत डायनासोर, प्रागैतिहासिक मगरींचे पूर्वज (Crocodyliforms), कासवे आणि इतर अनेक प्राचीन जीवांचे १०,००० पेक्षा जास्त जीवाश्म शोधून काढले आहेत. या शोधामधील सर्वात प्रसिद्ध शोध म्हणजे ‘उबेराबाटायटन रिबेरोई’ (Uberabatitan ribeiroi) नावाच्या टायटॅनोसॉर डायनासोरचा सांगाडा! ‘युनेस्को’ने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रचंडकाय डायनासोर तब्बल ८९ फूट (२७ मीटर) लांब आणि ३३ फूट (१० मीटर) उंच होता. हे दुर्मीळ अवशेष ‘सेरा दा गालगा’ (Serra da Galga) आणि ‘सेरा गेराल’ (Serra Geral) या पर्वत रांगांमधील प्रभावी भूगर्भीय संरचनेत आढळले आहेत.

१८ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा ‘गोंडवाना’ हा महाखंड विभागला गेला नव्हता, त्या काळातील महाकाय ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेल्या बेसॉल्टच्या रसापासून या पर्वतरांगा तयार झाल्या होत्या. जेव्हा डायनासोर या भागात वावरत होते, तेव्हा येथे उथळ डबके आणि नद्यांचे जाळे आलटून-पालटून तयार होत असे. त्यामुळे प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अवशेष चिखलात गाडले गेले आणि नैसर्गिकरीत्या सुरक्षित राहिले. प्राचीन पृथ्वीचा इतिहास आणि महाकाय जीवांचे अस्तित्व समजून घेण्यासाठी उबेराबा जिओपार्क हे आज जागतिक संशोधकांचे प्रमुख केंद्र बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT