प्योंगयाँग (उत्तर कोरिया) : कल्पना करा, तुम्ही तुमची आवडती निळी जीन्स घालून रस्त्यावरून फिरत आहात आणि अचानक पोलिस तुम्हाला अटक करतात. ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण उत्तर कोरियामध्ये हे एक कटू सत्य आहे. इथे निळी जीन्स घालणं हा फॅशनचा भाग नाही, तर एक गंभीर गुन्हा मानला जातो.
जगाच्या नकाशावर उत्तर कोरिया हा देश त्याच्या कठोर नियमांमुळे आणि हुकूमशाही राजवटीमुळे ओळखला जातो. या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन हे अमेरिकेचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या मते, निळ्या रंगाची जीन्स ही ‘अमेरिकी संस्कृती आणि साम्राज्यवाद’ यांचे प्रतीक आहे. त्यामुळे देशाच्या विचारधारेला आणि संस्कृतीला बाहेरील प्रभावापासून वाचवण्यासाठी त्यांनी निळ्या जीन्सवर देशव्यापी बंदी घातली आहे.
उत्तर कोरियामध्ये सरकारने लोकांच्या जीवनशैलीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे. नागरिकांनी कोणते कपडे घालावेत, हे सरकार ठरवते. पुरुषांनी आणि महिलांनी केस कसे ठेवावेत, यासाठी विशिष्ट नियम आहेत.
नियमांचे कोणी उल्लंघन करत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘फॅशन पोलिस’ रस्तोरस्ती तैनात असतात. जर कोणी चुकूनही निळी जीन्स घातलेले आढळले, तर त्याला थेट तुरुंगात डांबले जाते.
इतकेच नाही, तर अशी जीन्स विकणार्या दुकानदारांवरही मोठी दंडात्मक कारवाई करून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते.
अमेरिकेशी संबंधित कोणतीही वस्तू, जसे की विशिष्ट ब्रँडचे शर्ट, पियर्सिंग (शरीराला टोचून दागिने घालणे), केसांना रंग लावणे किंवा लेदर जॅकेटस् घालणे, यावरही उत्तर कोरियात कडक बंदी आहे.