सेऊल : दक्षिण कोरियातील कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी आपण परिधान करू शकू, असा रोबो तयार केला असून हा रोबो पॅरालिसिस बाधित रुग्णांसाठी वरदान ठरेल, असे संकेत आहेत. या रोबोला वॉकऑन सुट एफ वन असे नाव दिले गेले आहे. हा रोबो चक्क परिधान करता येण्यासारखा असल्याने यामुळे तो पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना जणू नवजीवन देऊ शकतो, असा यातील संशोधकांचा दावा आहे. सध्या याबाबत प्राथमिक संशोधन पूर्ण झाले असून पूर्ण प्रक्रियेनंतर तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असे संकेत आहेत.
केस्टच्या पथकाने तयार केलेला हा रोबो अतिशय हलका; पण त्याचवेळी अतिशय मजबूत आहे. या रोबोचे वजन केवळ 50 किलो आहे. हा रोबो अॅल्युमिनियम आणि टायटेनियमपासून तयार केला गेला आहे. या रोबोमध्ये 12 इलेक्ट्रॉनिक मोटर लावले गेले असून या माध्यमातून त्याची रचना मनुष्याच्या शरीराला अनुकूल अशी केली जाऊ शकते, जेणेकरून हा रोबो परिधान करणार्या व्यक्तीला त्या साहाय्याने सहजपणे चालता येऊ शकेल.
या रोबोतील सेन्सर प्रत्येक सेकंदाला हजारो सिग्नल कॅप्चर करतो आणि युजरच्या मेंदूला समजावून घेण्यासाठीही तो सक्षम असतो. हा रोबो सहजपणे चालण्याबरोबरच अगदी पायर्याही चढू शकतो. तसेच मार्गात काही अडथळे असतील, तर ते ही पार करू शकतो. प्रतितास 3.2 किलोमीटर चालण्याची त्याची क्षमता आहे. किम सेन-ह्यूंग या संशोधन पथकात समाविष्ट असलेल्या एका वैज्ञानिकाला स्वत:ला पॅरालिसिसचा त्रास असून या पार्श्वभूमीवर त्यांनी या संशोधनावर लक्ष केंद्रित केले होते. किम यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय सायबॅथलॉन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.