आता स्मार्टवॉचवरही मिळणार भूकंपाचा इशारा Pudhari File Photo
विश्वसंचार

आता स्मार्टवॉचवरही मिळणार भूकंपाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘गुगल’ची भूकंपाची वेळेवर सूचना देणारी सेवा, जी आतापर्यंत केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनपुरती मर्यादित होती, आता Wear OS वर चालणार्‍या स्मार्टवॉचसाठीही उपलब्ध होणार आहे. गुगलच्या अलीकडील सिस्टीम रीलिज नोटस्नुसार, ही सुविधा Wear OS वापरणार्‍या वापरकर्त्यांनाही भूकंपाचे इशारे देईल.

गुगलने ही भूकंप ओळख प्रणाली प्रथम ऑगस्ट 2020 मध्ये अँड्रॉईड फोनसाठी सुरू केली होती. नंतर ती हळूहळू जगभरातील अनेक भागांमध्ये लागू करण्यात आली आणि सप्टेंबर 2023 मध्ये भारतालाही या यंत्रणेचा भाग बनवण्यात आलं. ही प्रणाली पारंपरिक भूकंपीय उपकरणांवर अवलंबून नसून, जगभरातील लाखो अँड्रॉईड फोनमध्ये आधीपासून असलेल्या मोशन सेन्सर्सचा वापर करते. एखाद्या भागात अनेक फोनमध्ये एकाच वेळी कंपन नोंदवली गेल्यास, गुगलचे सर्व्हर त्यावरून विश्लेषण करून ठरवतात की, तो भूकंप आहे की नाही. भूकंपाची पुष्टी झाल्यास, आसपासच्या वापरकर्त्यांना काही सेकंद आधीच सूचना पाठवली जाते. या इशार्‍यांमध्ये भूकंपाची अंदाजित तीव्रता आणि उपकेंद्रापासूनचे अंतर दाखवले जाते. हे काही सेकंददेखील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची, सतर्क होण्याची संधी देतात. गुगलनुसार, आता Wear OS वर चालणार्‍या स्मार्टवॉचेसमध्येही ही सुविधा मिळणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचा फोन जवळ नसेल किंवा सायलेंट मोडमध्ये असेल, तरी तुमच्या स्मार्टवॉचमधील कंपन किंवा अलर्टद्वारे तुम्हाला भूकंपाची माहिती मिळू शकते. LTE-सक्षम स्मार्टवॉच वापरणार्‍यांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरू शकते; कारण अनेकवेळा हे वापरकर्ते फोनशिवाय बाहेर फिरत असतात.

भारतात ही सेवा कधी सुरू होणार?

सध्या भारतात Wear OS स्मार्टवॉचसाठी ही सुविधा कधी सुरू होईल, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, अँड्रॉईड फोनसारखीच ही सुविधा कदाचित टप्प्याटप्प्याने काही भागांत सुरू केली जाईल आणि नंतर संपूर्ण देशात लागू केली जाईल. ही मोठी प्रणाली अपडेटच्या रूपात येऊ शकते किंवा हळूहळू बॅकग्राऊंडमध्ये जोडली जाऊ शकते. ही सेवा भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती अर्थातच थांबवू शकत नाही; पण वेळीच मिळालेला इशारा जीव वाचवू शकतो. केवळ काही सेकंदांची सूचनादेखील योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची संधी देऊ शकते; मग ती टेबलाखाली लपणे असो, खिडकीपासून दूर जाणे असो किंवा मानसिक तयारी करणे असो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT