टोकियो : रेझर म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर प्लास्टिकचं हँडल आणि धारदार ब्लेड येतं. पण, जपानने या कल्पनेलाच वेगळं वळण दिलंय. इथे चक्क कागदापासून रेझर तयार करण्यात आला आहे. आता तुम्ही म्हणाल, कागदाचा रेझर आणि तोही पाण्यात वापरायचा? मग तो विरघळणार नाही का? पण, हा रेझर पाण्यातही टिकणारा आहे. त्यामुळे सध्या या अनोख्या रेझरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जपानमधील काई या ब्लेड रेझर बनवणाऱ्या कंपनीने हा ‘पेपर रेझर’ तयार केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार हे जगातील पहिल पेपरं रेझर आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे वाढणारा कचरा कमी करण्याच्या उद्देशाने ही संकल्पना पुढे आली. या रेझरची गंमत म्हणजे तो तयार स्वरूपात मिळत नाही. सुरुवातीला तो सपाट कागदासारखा दिसतो. त्यावर दिलेल्या सूचनांनुसार ओरिगामीप्रमाणे घड्या घालाव्या लागतात. त्यानंतर त्याचा हँडल तयार होत आणि ब्लेडचा भाग त्याला जोडला जातो. पूर्ण रेझर कागदाचा नसून त्याचा हँडल आणि ब्लेड धरून ठेवणारा भाग कागदाचा आहे. तर प्रत्यक्ष दाढी करण्यासाठी वापरले जाणारे तीन ब्लेड स्टेनलेस स्टीलचे आहेत. दुधाच्या पाकिटांवर वापरण्यात येणाऱ्या जलरोधक कागदापासून हे रेझर बनवले गेले असल्याने तो खराब होत नाही. हा रेझर केवळ ४ ग्रॅम वजनाचा आहे. पण, तोच तयार करण्यासाठी कंपनीला जवळपास दोन वर्षे लागली. १०० हून अधिक नमुने तयार करण्यात आले. जपानच्या या कल्पनेने रेझरची व्याख्याचं बदलली आहे. कागदाच्या घड्या घालून तयार होणारा आणि पाण्यातही टिकणारा रेझर पाहून लोकांना आश्चर्य वाटतंय!