वॉशिंग्टन : काही दिवसांपूर्वीच आपल्या सौरमालिकेतील शनीच्या एन्सिलाडस या बर्फाळ चंद्रावर पाण्याच्या वाफेचा छडा लावण्यात आला होता. आता आपल्या सौरमालिकेबाहेरील एका मोठ्या आकाराच्या ग्रहावरही पाण्याच्या वाफेचा छडा लावण्यात आला आहे. हा बाह्यग्रह आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूपेक्षाही मोठ्या आकाराचा आहे व गुरूसारखाच निव्वळ वायूचा गोळा आहे. 'नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने या ग्रहावरील वातावरणात पाण्याची वाफ शोधली आहे.
या ग्रहाला 'व्हास्प-18 बी' असे नाव देण्यात आले आहे. हा पृथ्वीपासून 400 प्रकाशवर्षे दूर आहे. 'नासा'च्या 'ट्रान्झिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट' (टेस), हबल आणि स्पिट्झर टेलिस्कोपच्या मदतीने 2009 मध्ये या ग्रहाचा शोध लागला. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने त्यावर पाण्याची वाफ सापडली आहे. हा गुरूपेक्षा 10 पट मोठे ग्रह आहे.
येथे एक वर्ष 23 तासांच्या बरोबरीचे आहे. त्याला 'अल्ट्रा हॉट गॅस जायंट' म्हटले जात आहे. याचे कारण या ग्रहावर तापमान 2,700 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे पाण्याची वाफ होऊन वातावरणात पसरले. 'नासा'ने स्पष्ट केले की ग्रह नेहमी त्याच्या तार्याकडे असतो, ज्याप्रमाणे चंद्राची एक बाजू नेहमी पृथ्वीकडे असते.