बीजिंग : आतापर्यंत तुम्ही पाण्यावर चालणाऱ्या जहाजांविषयी, बोटींविषयी आणि गाड्यांविषयी ऐकले असेल. परंतु, आता पाण्यावरून थेट धावणारी मोटारसायकलही समोर आली आहे. एवढेच नाही, तर या मोटारसायकलने नदीच्या पात्रात तब्बल ४० किलोमीटरचे अंतर कापून एक नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. या बाईकचे नाव ‘ZXMOTO MX450’ असे असून, ती चीनमधील ‘ZXMOTO’ या मोटारसायकल निर्मिती करणाऱ्या कंपनीने तयार केली आहे.
पाण्यावर चालवण्यासाठी या बाईकच्या रचनेत खास बदल (मॉडिफिकेशन) करण्यात आले होते. विशेष म्हणजे, कंपनीचे संस्थापक झांग जू यांनी स्वतः ही मोटारसायकल पाण्यावर चालवून हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या हुनान प्रांतात नोंदवला गेला असून, कंपनीच्या संस्थापकांसाठी ही एक खूप मोठी कामगिरी मानली जात आहे. त्यांनी आपल्या मॉडिफाईड केलेल्या मोटारसायकलला पाण्याच्या पृष्ठभागावर ४० किलोमीटरहून (२५ मैल) अधिक चालवून हा विक्रम स्थापित केला. हे विशाल अंतर पार करण्यासाठी झांग यांनी एका नदीच्या पात्रात या मोटारसायकलने अनेक फेऱ्या मारल्या.
या यशासह २००९ सालापासून उराशी बाळगलेले त्यांचे १७ वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून, त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’च्या वृत्तानुसार, बाईक बुडू नये आणि तिने पाण्याच्या पृष्ठभागावर सहज उभे राहावे यासाठी तिच्या खालच्या भागात विशेष ‘स्कीज’ बसवण्यात आले होते. पुढील भागातील स्कीजने बाईकवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. मोटारसायकलच्या मागच्या टायरने पाण्याला मागे ढकलणाऱ्या ‘प्रोपेलर’सारखे काम केले, ज्यामुळे बाईकला पुढे जाण्यासाठी योग्य वेग मिळाला. ४० किलोमीटरहून अधिक प्रवास करण्यासाठी बाईकमध्ये मोठी पेट्रोल टाकी बसवण्यात आली होती. तसेच, इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक भागांना पूर्णपणे वॉटरप्रूफ करण्यात आले होते.
ही बाईक प्रथम जमिनीवर प्रचंड वेग धारण करते आणि नंतर त्याच गतीच्या जोरावर पाण्याच्या पृष्ठभागावरून घसरत पुढे निघून जाते. झांग यांना पाण्यावर बाईक चालवण्याची कल्पना सर्वात आधी २००९ मध्ये सुचली होती. आपल्या पहिल्याच प्रयत्नात ते चारवेळा पाण्यात पडले होते आणि अवघे २० मीटर (६६ फूट) अंतर कापून अयशस्वी ठरले होते. मात्र, खचून न जाता सलग १७ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून आणि चुकांतून शिकत त्यांनी बाईकच्या एरोडायनामिक्स आणि वॉटर-स्कीईंग तंत्रज्ञानात सुधारणा केली; अखेर ४० किलोमीटरचा टप्पा पार करत गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले. अर्थात, ही व्यावसायिक उत्पादनासाठीची बाईक नाही!