विश्वसंचार

दोन लघुग्रहांवर लागला पाण्याचा छडा

Arun Patil

न्यूयॉर्क : पृथ्वीवर लघुग्रह किंवा धूमकेतूंच्या धडकेने पाणी आले असावे, असा एक सिद्धांत आहे. धूमकेतू हे बर्फाळ असतात व त्यामुळे त्यांच्यावर पाणी असते, हे तर स्पष्टच आहे. लघुग्रहांवरही पाण्याचे अस्तित्व असते, हे आता अनेक निरीक्षणांमधून दिसून येत आहे. 'बेन्नू' या लघुग्रहावरून पृथ्वीवर आणलेल्या नमुन्यांमध्ये पाण्याचा अंश असल्याचे अलीकडेच दिसून आले होते. आता आणखी दोन लघुग्रहांवरील पाण्याचा छडा लावण्यात आला आहे. या दोन लघुग्रहांची नावे 'आयरिस' आणि 'मॅसालिया' अशी आहेत.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'प्लॅनेटरी सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अनिसिया अरेडोंडो यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले की, जीवनासाठी पाणी हा एक मूलभूत घटक आहे. मात्र, ब्रह्मांडात तेच अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे मानले जात होते. आता तशी धारणा राहिलेली नाही. अंतराळात मुबलक प्रमाणात पाण्याचे अस्तित्व असल्याचे उघड होत आहे.

या दोन लघुग्रहांवरील पाण्याच्या रेणूंचे अस्तित्व त्याचेच द्योतक आहे. ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवेळी शिल्लक राहिलेले व अंतराळात भटकत राहिलेले अवशेष म्हणजे हे लघुग्रह. सोलर नेब्युलामध्ये ते कुठे बनले आहेत यावर त्यांची संरचना अवलंबून असते. कोरडे किंवा सिलिकेट अस्टेरॉईड हे सूर्याजवळ म्हणजेच एखाद्या तार्‍याजवळ बनलेले असतात. तसेच तार्‍यापासून बर्‍याच अंतरावर अनेक बर्फाळ पदार्थ एकत्र येऊन बर्फाळ लघुग्रह बनतात.

एखाद्या लघुग्रहाचे स्थान व संरचना पाहिल्यावर समजते की, त्याला बनवणारा सोलर नेब्युला कशाप्रकारे फैलावलेला होता. जर आपल्या सौरमंडळातील पाण्याचे वितरण समजून घेतले, तर अन्य तारा प्रणालींमधील असे वितरण समजून घेता येऊ शकते. त्यामधून जीवसृष्टी असलेला ग्रह शोधणे सुकर होईल. 'आयरिस' आणि 'मॅसालिया' हे लघुग्रह रेणुंच्या रूपाने पाण्याने संपन्न आहेत. 'सोफिया' वेधशाळेच्या साहाय्याने याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT