Portable ‘water harvester’ device | डेथ व्हॅलीच्या वाळवंटातील कोरड्या हवेतून निघणार पाणी  
विश्वसंचार

Portable ‘water harvester’ device | डेथ व्हॅलीच्या वाळवंटातील कोरड्या हवेतून निघणार पाणी

वैज्ञानिकांनी तयार केले ‘मॅजिक डिव्हाईस’; मिटणार जलसंकट?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अत्यंत कडक ऊन आणि कोरड्या वाळवंटात कोणत्याही विजेच्या, प्लगच्या किंवा बॅटरीच्या मदतीशिवाय केवळ सूर्यप्रकाशाचा वापर करून पिण्याचे स्वच्छ पाणी तयार होऊ लागले तर? ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील प्रसंगासारखे वाटत असले, तरी अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कलेच्या वैज्ञानिकांनी हे सत्यात उतरवून दाखवले आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ उमर याघी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने एक असे पोर्टेबल ‘वॉटर हार्वेस्टर’ डिव्हाईस तयार केले आहे, जे जगातील सर्वात उष्ण आणि कोरड्या मानल्या जाणाऱ्या ‘डेथ व्हॅली’च्या हवेतूनही पाणी शोषून घेते.

हातात सहज मावणारे हे डिव्हाईस कोणत्याही बाह्य ऊर्जेवर किंवा फिरणाऱ्या भागांवर अवलंबून नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक सूर्यप्रकाशावर चालते. या डिव्हाईसमध्ये MOF म्हणजेच ‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क’चा वापर केला गेला आहे, जी अत्यंत छिद्रयुक्त (Porous) अशी क्रिस्टलाईन रचना आहे. यामध्ये ॲल्युमिनियमवर आधारित MOF-303 या स्पंजसारख्या अत्यंत छिद्रयुक्त पदार्थाचा वापर करण्यात आला आहे. वाळवंटात रात्रीच्या वेळी हवेत हलका ओलावा असतो, तेव्हा हा पदार्थ हवेतील पाण्याचे रेणू स्वतःमध्ये शोषून घेतो.

दिवसा सूर्यप्रकाशाची उष्णता या पदार्थावर पडताच शोषून घेतलेले पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडते आणि डिव्हाईसच्या थंड भागावर आदळून द्रवरूपात जमा होते. सर्वसामान्यपणे दमट हवेतून पाणी तयार करणे सोपे असते, परंतु वाळवंटात जिथे सापेक्ष आर्द्रता २० टक्के किंवा त्याहून कमी असते, तिथे पारंपरिक डिह्युमिडिफायर पूर्णपणे अपयशी ठरतात. डेथ व्हॅलीमध्ये या हार्वेस्टरने एका दिवसात प्रतिकिलोग्राम MOF-303 मधून २१० ग्रॅम पाणी तयार केले. बर्कलेच्या अधिक ओलावा असलेल्या हवेत या डिव्हाईसने प्रतिकिलोग्राम दररोज २८५ ग्रॅमपर्यंत पाणी तयार केले. हे निष्कर्ष ‘नेचर वॉटर’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

२०१७ मध्ये एमआयटीसोबत तयार केलेल्या सुरुवातीच्या मॉडेलमध्ये झिर्कोनियम-बेस्ड MOF-801 चा वापर करण्यात आला होता, ज्याची किंमत प्रतिकिलोग्राम सुमारे १६० डॉलर होती. मात्र, नव्या संशोधनात ॲल्युमिनियमचा वापर करून हा खर्च प्रतिकिलोग्राम अवघ्या ३ डॉलरवर आणला गेला आहे. खर्चात ९८ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे हे तंत्रज्ञान आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याच्या जवळ पोहोचले आहे. याघी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानावर आधारित पुढील विकासामुळे उत्पादनक्षमतेत मोठी वाढ झाली असून, आता दररोज शेकडो लिटर पाणी तयार करू शकणारे अधिक मोठे आणि प्रगत डिव्हाईस बनवण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT