Water Armor Technology | आता कपडे धुण्यासाठी अनोखे ‘वॉटर आर्मर’ तंत्रज्ञान 
विश्वसंचार

Water Armor Technology | आता कपडे धुण्यासाठी अनोखे ‘वॉटर आर्मर’ तंत्रज्ञान

डिटर्जंटची गरज नाही; 80 टक्के पाणी, वीज बचत

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : कपड्यांवरील अन्न, तेल किंवा धुळीचे डाग काढण्यासाठी आता महागडे डिटर्जंट (साबण/पावडर) किंवा बादल्या भरून पाण्याची गरज भासणार नाही. शास्त्रज्ञांनी एका अशा ‘स्वयं-स्वच्छ’ (Self- cleaning) कोटिंगचा शोध लावला आहे, ज्यामुळे कपड्यांवरील डाग केवळ पाण्याच्या प्रवाहाने सहज निघून जाऊ शकतात. नवीन संशोधनानुसार, या तंत्रज्ञानामुळे कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी आणि विजेचा वापर तब्बल 80 टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकतो.

या कोटिंगमुळे कपड्याच्या पृष्ठभागावर पाण्याचा एक अत्यंत सूक्ष्म, संरक्षणात्मक थर तयार होतो, ज्याला शास्त्रज्ञांनी ‘मॉलिक्युलर वॉटर आर्मर’ (Molecular Water Armor - आण्विक जल कवच) असे नाव दिले आहे. कपडे धुणे ही रोजची गरज असली, तरी यामुळे पर्यावरणावर मोठा ताण पडतो. वॉशिंग मशिनच्या एका सायकलमध्ये सुमारे 40 ते 60 लीटर स्वच्छ पाणी वापरले जाते. तसेच, डाग काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या डिटर्जंटमुळे कपड्यांमधील ‘मायक्रोप्लास्टिक्स’ (अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण) वेगळे होतात आणि रसायनांनी दूषित झालेले पाणी नदी-नाल्यांमध्ये सोडले जाते.

एकट्या चीनमध्ये कपडे धुण्यामुळे दरवर्षी अब्जावधी लीटर सांडपाणी तयार होते. या समस्येवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी डिटर्जंट किंवा मशिन सुधारण्याऐवजी थेट कपड्यांच्या धाग्यांमध्येच बदल करण्याचे ठरवले. चीनमधील ‘साऊथईस्ट युनिव्हर्सिटी’चे चोंग्लिंग चेंग आणि ‘जिलिन युनिव्हर्सिटी’चे दायांग वांग या भौतिकशास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी सुती, रेशीम आणि पॉलिस्टरच्या कपड्यांवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असलेल्या पॉलिमरचे एकापाठोपाठ एक थर स्प्रे केले. या बहुस्तरीय कोटिंगमुळे कपड्याच्या पृष्ठभागावर ‘सल्फोनेट ग्रुप्स’ (गंधकयुक्त रासायनिक घटक) तयार होतात. हे घटक हवेतील आणि सभोवतालच्या पाण्याचे रेणू स्वतःकडे खेचून घेतात आणि कपड्यावर पाण्याचा एक अतिशय पातळ थर (कवच) तयार करतात.

संशोधकांनी सांगितले की, ‘हे जल कवच कपडा आणि बाहेरील घाण यांच्यात भिंतीसारखे काम करते. यामुळे तेल, अन्नाचे डाग, घाम आणि जंतू कपड्याच्या मुख्य धाग्याशी थेट आणि मजबूत संपर्क साधू शकत नाहीत. परिणामी, डाग कपड्याला घट्ट चिकटत नाहीत आणि डिटर्जंटशिवाय, केवळ पाण्याच्या हलक्या प्रवाहाने किंवा कमी वेळात विसळून सहज निघून जातात.‘ हे तंत्रज्ञान नेहमीच्या वॉटरप्रूफ (जलरोधक) कपड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. वॉटरपू्रफ कपड्यांवरून पाण्याचे थेंब फक्त घसरून जातात, पण या नवीन तंत्रज्ञानामुळे कपडे प्रत्यक्षात स्वच्छ होतात. हे क्रांतिकारी संशोधन 19 मार्च रोजी ‘कम्युनिकेशन्स केमिस्ट्री’ या नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून, यामुळे भविष्यात घरगुती लाँड्री क्षेत्रात आणि पर्यावरण संवर्धनात मोठे बदल घडून येतील, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT