वॉशिंग्टन :
पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर आपले दैनंदिन व्यवहार कसे करीत असतील, याचे कुतुहल अनेकांना असते. शून्य गुरुत्वाकर्षणात असे व्यवहार करीत असताना अनेक समस्या येऊ शकतात; पण त्यावर आधीच तोडगा काढलेला असतो. आता अंतराळ स्थानकावर शाम्पूने केस कसे धुतले जातात याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
'नासा'च्या अंतराळवीर कॅरेन नायबर्ग शाम्पूने केस धूत असतानाचा हा व्हिडीओ आहे. अर्थातच हा जुना व्हिडीओ असून तो आता री-शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कॅरेन नळीने डोक्याला आधी थोडेसे पाणी लावत असताना दिसतात. त्यामधील काही पाणी हवेत तरंगत दूर जात असताना दिसते. त्या पटकन पाण्याला हातात घेऊन आपल्या केसाला लावतात. त्यांचे केस वार्यांनी उडत असताना उभे होतात तसे दिसतात. ते तसेच राहतात. अंतराळवीरांसाठी पाणी हे अत्यंत मौल्यवान असते. पृथ्वीवरून आणलेले पाणीच ते जपून वापरत असतात. कॅरेन आपल्या केसांना 'नो-रिन्स' शाम्पू लावतात. एका टॉवेलने केसात पूर्णपणे पसरवतात. धावत्या पाण्याशिवाय, अंतराळात टॉवेलच्या सहाय्याने केसातील धूळही पुसून काढावी लागते, असे त्या सांगतात. त्या सांगतात की अंतराळ स्थानकात सर्व काही रिसायकल होते. त्यांच्या केसांसाठी वापरलेले पाणीही बाष्पीभवन होऊन मग एअरकंडिशनिंग सिस्टीमच्या सहाय्याने घनरूप होते व ते त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा भाग होते.