नवी दिल्ली : जगभरात वेगाने वाढणारे तापमान आता केवळ हवामान संकट राहिलेले नाही, तर अन्नसंकटाचेही कारण बनत आहे. एका ताज्या अभ्यासानुसार, जागतिक तापमानात प्रत्येक एक अंश सेल्सिअस वाढीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या जेवणाच्या ताटातून सरासरी 120 कॅलरी कमी होतील. हे प्रमाण सध्याच्या दैनंदिन सेवनाच्या सुमारे 4.4 टक्के आहे. ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात इशारा दिला आहे की, या शतकाच्या अखेरीस प्रमुख पिकांमधून मिळणार्या कॅलरीमध्ये 24 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. यामुळे कोट्यवधी लोकांसमोरील भूक आणि कुपोषणाची समस्या अधिक गंभीर होईल.
स्टॅनफोर्ड विद्यापीठासह जगातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनी केलेल्या या अभ्यासात म्हटले आहे की, जसजशी पृथ्वी उष्ण होईल, तसतसे गहू, मका, सोयाबीन, जव यांसारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन घटेल. प्रमुख संशोधक प्रा. सोलोमन हसियांग यांच्या मते, जर तापमान तीन अंशांनी वाढले, तर संपूर्ण जगाने आपला सकाळचा नाश्ता सोडण्यासारखे होईल. याचा सर्वात जास्त फटका गरीब देशांना बसेल, जिथे आधीच 80 कोटी लोक अन्नसुरक्षेच्या समस्येशी झुंजत आहेत.
अमेरिकेचा मिडवेस्ट, जो आज मका आणि सोयाबीन उत्पादनाचे केंद्र आहे, भविष्यात सर्वाधिक प्रभावित होणार्या प्रदेशांपैकी एक असेल. हवामान बदलामुळे येथील तापमानात मोठी वाढ, पावसाच्या स्वरूपात अस्थिरता आणि उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे. याउलट कॅनडा, रशिया आणि चीनसारख्या थंड देशांमध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान बदलाचा परिणाम होऊ लागला आहे. 2050 पर्यंतच हवामान बदलामुळे पिकांच्या उत्पादनात 8 टक्के घट होण्याचा धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, जर आतापासून जागतिक कार्बन उत्सर्जनात वेगाने कपात केली आणि शेतकर्यांना हवामान-अनुकूल कृषी तंत्रज्ञान व संसाधने पुरवली, तर होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. मात्र, यासाठी जागतिक स्तरावर तीव्र राजकीय इच्छाशक्ती आणि जलद कृती आवश्यक आहे.