वांग निंग : एका सामान्य तरुणाचा अब्जाधीश होण्यापर्यंतचा प्रवास Pudhari File Photo
विश्वसंचार

वांग निंग : एका सामान्य तरुणाचा अब्जाधीश होण्यापर्यंतचा प्रवास

लाबूबू बाहुल्यांचा कल्पक उद्योजक

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : सध्या सेलिब्रिटींमध्ये फॅशन आयकॉन बनलेल्या लाबूबू बाहुल्यांची निर्मिती करणारा उद्योजक म्हणजे वांग निंग. चीनच्या हेनान प्रांतातील हुओजिया कौंटीमध्ये जन्मलेल्या वांग निंग यांचे आई-वडील एक छोटा व्यवसाय चालवत होते. सामान्य परिस्थितीत वाढलेल्या वांग यांनी 2009 मध्ये सिआस युनिव्हर्सिटीमधून जाहिरात विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पेकिंग युनिव्हर्सिटीच्या गुआंगहुआ स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून 2017 मध्ये एमबीए आणि नंतर त्सिंगुआ युनिव्हर्सिटीमधून ईएमबीए पूर्ण केले. शिक्षणाने पाया भक्कम झाल्यावर, त्यांनी 2010 मध्ये ‘पॉप मार्ट’ या खेळण्यांच्या कंपनीची स्थापना केली आणि त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे. आज वांग निंग यांची अंदाजे एकूण संपत्ती 21.9 अब्ज डॉलर इतकी आहे.

वांग निंग यांनी बीजिंगमधील एका छोट्या खेळण्यांच्या स्टार्टअपला जागतिक स्तरावर नेले, ते त्यांच्या ‘ब्लाईंड बॉक्स’ या अनोख्या संकल्पनेमुळे. या संकल्पनेत, ग्राहकांना एका बंद बॉक्समध्ये कोणती बाहुली आहे, हे खरेदी करेपर्यंत कळत नाही. यामुळे ग्राहकांमध्ये एक प्रकारची उत्सुकता, थरार आणि संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. एका बिझनेस टिप्स पेजनुसार, या नावीन्यपूर्ण कल्पनेला केनी वोंग (प्रसिद्ध ‘मॉली’ कॅरेक्टरचे निर्माते) यांसारख्या कलाकारांसोबतच्या सहकार्याची जोड मिळाली. ही संकल्पना 20 ते 35 वयोगटातील तरुणांना प्रचंड आवडली. पाहता पाहता पॉप मार्टने 21 देशांमध्ये 450 हून अधिक रिटेल स्टोअर्स आणि 2,300 व्हेंडिंग मशिन्सचे जाळे उभारले.

2020 मध्ये, कंपनी हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली आणि तिचे बाजार मूल्य 13 अब्ज डॉलरच्या पुढे गेले. अनेकांना हे माहीत नाही की जगभरात धुमाकूळ घालणार्‍या ‘लाबूबू’ या बाहुल्यांचा जन्म हाँगकाँगचे कलाकार केसिंग लुंग यांच्या स्केचबुकमधील एका साध्या चित्रातून झाला होता. वांग निंग यांच्या पॉप मार्ट कंपनीने या चित्राला जिवंत केले आणि पाहता पाहता ते एक पॉप कल्चर ट्रेंड बनले.‘लाबूबू’ हे नॉर्वेजियन परीकथांमधून प्रेरित एक छोटे राक्षसी पात्र (monster elf) आहे. या बाहुल्या अनेकदा ‘ब्लाईंड बॉक्स’मध्ये विकल्या जातात आणि त्यांच्या थीम असलेल्या सीरिज असतात. प्रत्येक सीरिजमध्ये जाहिरात केलेल्या डिझाईन व्यतिरिक्त एक दुर्मीळ ‘सिक्रेट’ बाहुलीदेखील असते, ज्यामुळे संग्राहकांमध्ये ती मिळवण्याची चढाओढ लागते.

आशिया, युरोप आणि अमेरिकेतील ग्राहक एका-एका बाहुलीवर मोठी रक्कम खर्च करत आहेत. बीजिंगमधील एका लिलावात तर मानवी आकाराच्या लाबूबू बाहुलीला तब्बल 1.08 दशलक्ष युआन म्हणजेच सुमारे 1.2 कोटी रुपयांहून अधिक किंमत मिळाली. या क्रेझला खरी सुरुवात झाली ती के-पॉप ग्रुप ‘ब्लॅकपिंक’ची सदस्य लिसा हिच्यामुळे. तिला या बाहुलीसोबत पाहिल्यानंतर जगभरातील सेलिब्रिटींमध्ये जणू स्पर्धाच लागली. किम कार्दशियन, रिहाना, दुआ लिपा यांसारख्या आंतरराष्ट्रीय तार्‍यांपासून ते भारतात अनन्या पांडे, टि्ंवकल खन्ना, शर्वरी वाघ आणि सना मकबूल यांसारख्या सेलिब्रिटींनाही या लाबूबू बाहुल्यांसोबत पाहिले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT