Walking Shark | पापुआ न्यू गिनीमध्ये आढळला ‘चालणारा शार्क’ 
विश्वसंचार

Walking Shark | पापुआ न्यू गिनीमध्ये आढळला ‘चालणारा शार्क’

पुढारी वृत्तसेवा

पापुआ न्यू गिनी : समुद्राच्या तळावर पायांसारख्या पंखांचा वापर करून चालणाऱ्या शार्कची एक नवी प्रजाती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. ‘डजन्स वॉकिंग शार्क’ असे या नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले असून, हा शोध २०२६ च्या ‘शार्क वीक’च्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सनशाईन कोस्टच्या संशोधकांनी २०२५ मध्ये पापुआ न्यू गिनीच्या आग्नेय किनाऱ्यावरील मिल्ने बे परिसरात केलेल्या संशोधनादरम्यान ही प्रजाती शोधली. या शार्कची लांबी सुमारे एक मीटर असून, तो उथळ प्रवाळभित्तींवर आढळतो. मजबूत पंखांचा वापर तो पायांसारखा करतो आणि समुद्राच्या तळावर हळूहळू पुढे सरकतो. या शार्कच्या शरीरावर तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण पांढऱ्या रेषा आणि ठिपके आहेत.

संशोधक जेस ब्लेकवे आणि क्रिस्टीन डजॉन यांना या वेगळ्या रंगसंगतीमुळे ही अज्ञात प्रजाती असल्याचा संशय आला. पुढील दोन रात्रींच्या पाहणीत याच वैशिष्ट्यांचे आणखी ११ शार्क आढळल्याने संशोधकांचा अंदाज बळावला. या प्रजातीला ‘डजन्स वॉकिंग शार्क’ हे नाव शार्क जनुकशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक क्रिस्टीन डजॉन यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पापुआ न्यू गिनीतील स्थानिक समुदाय या शार्कला यापूर्वीपासूनच ओळखत होते. ते त्याला ‘काडेडेकेडेवा’ (कुकुर शार्क किंवा आळशी शार्क) म्हणतात. मात्र, नव्या प्रजातीच्या शोधासोबतच तिच्या संवर्धनाची चिंता वाढली आहे.

हा शार्क पापुआ न्यू गिनीतील अत्यंत मर्यादित भौगोलिक क्षेत्रात आढळतो. त्यामुळे अधिवासाचा ऱ्हास, किनारी विकास, मासेमारी आणि हवामान बदलाचा त्याच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. जगभरातील एक-तृतीयांशपेक्षा अधिक शार्क आणि रे प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात असल्याचे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययूसीएन) म्हटले आहे. त्यामुळे या नव्या प्रजातीचा अधिवास आणि संख्या याबाबत अधिक माहिती मिळवून तिच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे.वैज्ञानिकांच्या मते, समुद्राचा उथळ भागही अद्याप पूर्णपणे शोधला गेलेला नाही. नव्या ‘चालणाऱ्या शार्क’चा शोध हे त्याचेच आणखी एक उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT