Andes Mountains Formation | ज्वालामुखीने जपले अँडीज पर्वताच्या निर्मितीचे दुर्मीळ दृश्य File photo
विश्वसंचार

Andes Mountains Formation | ज्वालामुखीने जपले अँडीज पर्वताच्या निर्मितीचे दुर्मीळ दृश्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सुमारे २.२ कोटी (२२ दशलक्ष) वर्षांपूर्वी झालेल्या एका महाकाय ज्वालामुखीच्या उद्रेकाने तरुण वयातील ‘अँडीज’ पर्वत रांगेचे एक दुर्मीळ दृश्य जसेच्या तसे गोठवून ठेवले आहे. या शोधावरून ही अवाढव्य पर्वत रांग अत्यंत संथ आणि सातत्यपूर्ण प्रक्रियेतून तयार झाल्याचे समोर आले आहे.

सध्याच्या उत्तर चिली भागात असलेल्या ‘लाऊका कॅल्डेरा’ येथून झालेल्या या उद्रेकाने संपूर्ण प्रदेशावर ‘इग्निमब्राईट’ (Ignimbrite) नावाच्या खडकाचा थर पसरवला. खडक, ज्वालामुखीय वायू आणि राख यांच्या अत्यंत उष्ण प्रवाहाने (Pyroclastic flow) संपूर्ण परिसराला वेढून टाकल्यानंतर हा खडक तयार होतो. इसवी सन ७९ मध्ये इटलीतील ‘माऊंट व्हेसुव्हिअस’च्या उद्रेकानंतर आलेल्या अशाच महाकाय प्रवाहाने ‘पॉम्पेई’ हे रोमन शहर ढिगाऱ्याखाली गाडले होते आणि तिथल्या वस्तू व मानवी अवशेष जसेच्या तसे जतन केले होते. ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या मासिकात ११ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, या अँडियन इग्निमब्राईटच्या थराखालील भागाचे विश्लेषण करण्यात आले.

या उद्रेकाने तीक्ष्ण किंवा उंच शिखरांना नव्हे, तर झुकलेल्या टेकड्यांना (Rolling foothills) आपल्या पोटात गाडले असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे भू-आकारशास्त्रज्ञ (Geomorphologist) बायरन ॲडम्स यांनी सांगितले, ‘पॉम्पेई शहराने मानवी इतिहासातील एक क्षण ज्वालामुखीच्या उद्रेकाने कसा गोठवला हे दाखवले होते. तर हा अभ्यास हे सिद्ध करतो की, याहून मोठे उद्रेक पृथ्वीच्या इतिहासातील क्षणही गोठवू शकतात. संपूर्ण प्रदेश ज्वालामुखीय साचलेल्या थराखाली गाडला गेल्याने, उद्रेकापूर्वी पर्वत कसे तयार होत होते, याचे पुरावे सुरक्षित राहतात. आपण हा गाडला गेलेला भाग प्रत्यक्ष उकरून पाहू शकत नाही; पण ज्वालामुखीय थराचा आकार आणि नद्यांमुळे पर्वतांना कसा आकार मिळतो या ज्ञानाचा वापर करून खाली काय दडले आहे, याचा अंदाज लावू शकतो.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT