Volcanic Comet Explosion 
विश्वसंचार

Volcanic Comet Explosion : ज्वालामुखी धूमकेतूचा स्फोट होऊन बनला प्रकाशाचा सर्पिलाकार

अंतराळातील एका रहस्यमय ज्वालामुखी धूमकेतूने धारण केले रौद्र रूप

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अंतराळातील एका रहस्यमय ज्वालामुखी धूमकेतूने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या अनेक वर्षांतील सर्वात भीषण स्फोटानंतर या धूमकेतूचे रूपांतर प्रकाशाच्या एका अवाढव्य, ‌‘जीवाश्मासारख्या‌’ सर्पिलाकार आकृतीत झाले असल्याचे नवीन छायाचित्रांमधून समोर आले आहे. या घटनेमुळे खगोलशास्त्रज्ञांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

‌‘29 झ/श्वार्झमन-वाचमन‌’ (29 झ) नावाचा हा अनोखा धूमकेतू सुमारे 60 किलोमीटर व्यासाचा एक विशाल बर्फाचा गोळा आहे. हा धूमकेतू ‌‘सँटॉर‌’ नावाच्या दुर्मीळ गटातील आहे, जे आपल्या सूर्यमालेच्या अंतर्गत भागात फिरत असतात. विशेष म्हणजे, हा धूमकेतू ‌‘क्रायोव्होल्कॅनिक‌’ श्रेणीत येतो, म्हणजेच यातून लाव्हारसाऐवजी गोठलेला वायू आणि बर्फाचे फवारे बाहेर पडतात. जेव्हा या धूमकेतूचे बाह्य कवच सूर्याच्या किरणोत्सर्गामुळे तापते, तेव्हा त्याच्या आतील गोठलेला वायू आणि धूळ (ज्याला ‌‘क्रायोमॅग्मा‌’ म्हणतात) गरम होऊन वायूमध्ये रूपांतरित होऊ लागतात. यामुळे धूमकेतूच्या आत प्रचंड दाब निर्माण होतो आणि अचानक कवच फाटून त्यातील बर्फाळ द्रव्य अवकाशात वेगाने फेकले जाते. यामुळे धूमकेतूभोवती असलेला वायूचा ढग विस्तारतो आणि तो रात्रीच्या आकाशात अधिक प्रखरपणे चमकू लागतो. 10 फेबुवारी रोजी या धूमकेतूने अचानक भीषण स्फोट अनुभवला, ज्यामुळे त्याची चमक तब्बल 100 पटीने वाढली. तज्ज्ञांच्या मते, गेल्या 25 वर्षांतील हा या धूमकेतूचा पाचवा सर्वात मोठा स्फोट आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या एका महास्फोटामुळे हा धूमकेतू सामान्यपेक्षा 300 पटीने अधिक चमकला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT