लंडन : आजकल धावपळीच्या जीवनशैलीत आतड्यांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विशेषतः सूज येणे, पोटदुखी, वारंवार जुलाब होणे, पोटात पेटके येणे आणि अशक्तपणा अशा तक्रारी अनेक लोकांमध्ये दीर्घकाळ टिकून राहतात. या समस्या केवळ पोटापुरत्या मर्यादित नसून त्या आपली रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जेची पातळीही कमी करतात. अशा परिस्थितीत शरीराला योग्य पोषण मिळणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः ‘व्हिटॅमिन-डी’, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
अनेकांचा असा समज असतो की, व्हिटॅमिन-डी केवळ हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, हे पोषक तत्त्व तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीही तितकेच गरजेचे आहे. जेव्हा आतड्यांमध्ये काही आजार उद्भवतात, तेव्हा शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा चुकून आतड्यांच्या आवरणावर हल्ला करू लागते, ज्यामुळे सूज आणि नुकसान वाढते.
व्हिटॅमिन-डी या प्रक्रियेत समतोल राखण्याचे काम करते आणि सूज कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन-डी आतड्यांची आतील भिंत मजबूत बनवते. यामुळे अन्नातील पोषक तत्त्वे शरीरात चांगल्या प्रकारे शोषली जातात. शरीराला मिळणारे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे रिकव्हरी आणि ऊर्जेसाठी महत्त्वाचे असतात. संशोधनात असेही आढळून आले आहे की, ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन-डी ची कमतरता असते, त्यांच्यामध्ये आतड्यांच्या आजारांची लक्षणे अधिक तीव असतात आणि त्यांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. कोवळे ऊन हा व्हिटॅमिन-डी चा सर्वात मोठा आणि नैसर्गिक स्रोत आहे. दिवसातून १५-२० मिनिटे हलक्या उन्हात बसणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या जीवनसत्वासाठी दूध, अंडी, मशरूम आणि मासे यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.