वॉशिंग्टन : बायोटेक आणि अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानाच्या संगमातून शास्त्रज्ञांनी एक नवा इतिहास रचला आहे. जगात पहिल्यांदाच संशोधकांनी एका विषाणूचे संपूर्ण ‘जीनोम’ क्वांटम कॉम्प्युटरला वाचता आणि त्याचे विश्लेषण करता येईल अशा डिजिटल कोडमध्ये यशस्वीपणे रूपांतरित केले आहे. ‘नेक्स्ट जनरेशन’ तंत्रज्ञानाच्या दिशेने टाकलेले हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
या यशामुळे भविष्यात महाभयंकर महामारी पसरवणाऱ्या विषाणूंचा शोध घेणे आणि त्यांच्यावर अवघ्या काही मिनिटांत लस तयार करणे शक्य होणार आहे. साधारणपणे, जैविक डेटा हा खूप गुंतागुंतीचा असतो. विषाणूच्या जेनोममध्ये लाखो रासायनिक अक्षरे असतात, ज्यांचा अभ्यास करणे सामान्य सुपरकॉम्प्युटरसाठीही खूप वेळखाऊ आणि कठीण असते. शास्त्रज्ञांनी या मोहिमेत विषाणूच्या डीएनए/आरएनएमधील जनुकीय माहितीचा असा डेटा तयार केला, जो क्वांटम कॉम्प्युटरच्या मूलभूत घटकांद्वारे म्हणजेच ‘क्युबिटस्’द्वारे थेट वाचला जाऊ शकतो. यामुळे पहिल्यांदाच एका जैविक विज्ञानातील माहितीचे थेट क्वांटम माहितीमध्ये भाषांतर करण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
पारंपरिक संगणक हे ‘०’ आणि ‘१’ (Bits) च्या स्वरूपात काम करतात, तर क्वांटम कॉम्प्युटर हे क्वांटम फिजिक्सच्या नियमांवर काम करतात. यामुळे ते एकाच वेळी कोट्यवधी शक्यतांचा अभ्यास करू शकतात. वेगवान विश्लेषण : ज्या विषाणूच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी सामान्य कॉम्प्युटरला अनेक महिने किंवा वर्षे लागतात, त्याचा अचूक अभ्यास क्वांटम कॉम्प्युटर काही सेकंदांत करू शकतो. उत्परिवर्तनाचा (Mutation) अंदाज : विषाणू स्वतःमध्ये काय बदल घडवून आणणार आहे, याचा अंदाज हा कॉम्प्युटर आधीच लावू शकेन. या अभूतपूर्व प्रयोगामुळे वैद्यकीय संशोधनाचा वेग कित्येक पटीने वाढणार आहे. जेव्हा जेव्हा एखादा नवा विषाणू जगात येईल, तेव्हा त्याचे जीनोम थेट क्वांटम कॉम्प्युटरमध्ये फीड केले जाईल. कॉम्प्युटर काही मिनिटांत त्या विषाणूची ताकद, त्याची कमकुवत बाजू आणि त्याला नष्ट करू शकणाऱ्या औषधांचे किंवा लसींचे अचूक सूत्र (Formulas) शास्त्रज्ञांना शोधून देऊ शकेल.
संशोधनाचा नवा अध्याय
हा प्रयोग सध्या एका विषाणूवर यशस्वी झाला असला, तरी शास्त्रज्ञांचे पुढील उद्दिष्ट मानवी जीनोम (Human Genome) अशाच प्रकारे क्वांटम कॉम्प्युटरच्या भाषेत आणण्याचे आहे. जर असे झाले, तर मानवी शरीरातील कॅन्सर किंवा अनुवांशिक आजारांचे मूळ शोधून ते कायमचे नष्ट करणे विज्ञानाला सहज शक्य होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.