अहमदाबाद : आजही काही गावांत तेथील अनोख्या परंपरा सर्वांचे लक्ष आकर्षित करतात. असे एक गाव गुजरातमध्येही आहे. या गावातील कोणत्याही घरात चूल नाही. गावातील सर्वजण एकत्र बसून जेवतात आणि कोणीही उपाशी राहत नाही. या गावाचे नाव ‘चंदंकी’ असे आहे. सुमारे 1,000 लोकसंख्येच्या या गावात सामुदायिक स्वयंपाकघराची अनोखी परंपरा चालत आली आहे. या संपूर्ण गावात जेवण रोज एकाच जागी तयार केले जाते आणि सर्व गावकरी एकत्र येऊन जेवतात. ही व्यवस्था केवळ जेवणापर्यंत मर्यादित नाही. तर गावच्या एकता आणि सामाजिक सद्भावाचे एक प्रतीक आहे.
गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीने सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा गावातील तरुण नोकरी आणि पोटापाण्याच्या निमित्ताने शहरात, तसेच परदेशात जाऊन राहू लागले, तेव्हा गावातील वृद्धांची संख्या वाढली. यामुळे एकत्र येऊन जेवण तयार करणे आणि एकत्र पंगतीला बसणे सुरू झाले. बऱ्याच काळानंतरही अशी परंपरा सुरूच ठेवण्यात आली आहे. आज ही गावाची ओळख बनली आहे.
आज सुमारे 100 ग्रामस्थ रोज जेवण शिजवण्याची जबाबदारी स्वत: वाटून घेतात. त्यामुळे कोणावर ओझं पडत नाही. आमटी किंवा वरण, भाज्या, चपात्या सर्वजण एकत्र येऊन तयार करतात. तसेच, सणासुदीला आणि खास निमित्ताने वेगवेगळी पक्वान्नेदेखील तयार केली जातात. चंदंकीचे सामूहिक किचन आता पर्यटकांसाठीही एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे येणारे पाहुणे केवळ जेवणाचा आनंदच घेत नाहीत, तर गावातील संस्कृती, एकता आणि एकजुटीचा अनुभवदेखील घेतात.