चित्तौडगड : राजस्थानमधील धीरजी का खेडा गावात प्राणी आणि मानवामधील जिव्हाळ्याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. एका लाडक्या माकडाच्या निधनानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून, गावकऱ्यांनी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे अंत्यसंस्कार पूर्ण केले.
हे माकड गेल्या दोन वर्षांपासून गावातील खाखल देव मंदिरात राहत होते. अत्यंत शांत स्वभावाचे हे माकड गावकरी आणि लहान मुलांमध्ये पूर्णपणे मिसळले होते. दररोज मंदिरात होणाऱ्या आरतीला ते न विसरता हजेरी लावत असे.
बुधवारी या माकडाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या घटनेने हळहळलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत त्याच्यावर मानवी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. वाजत-गाजत अंत्ययात्रा काढल्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात विधी करण्यात आले. विशेष म्हणजे, गावातील ११ पुरुषांनी मुंडन केले आणि परंपरेनुसार पिंडदानदेखील पार पडले. त्यानंतर अस्थींचे मातृकुंडिया येथे विसर्जन करण्यात आले. प्राण्याप्रति दाखवलेल्या या निस्सीम आदराची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.