Viking Age Woman’s Clothes | १३०० वर्षांनंतरही सुरक्षित राहिले वायकिंग युगातील महिलेचे कपडे 
विश्वसंचार

Viking Age Woman’s Clothes | १३०० वर्षांनंतरही सुरक्षित राहिले वायकिंग युगातील महिलेचे कपडे

धातूच्या ब्रोचमुळे जतन झाल्याचा संशोधकांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

कोपनहेगन : डेन्मार्कच्या पश्चिम जटलंड भागात पुरातत्त्वज्ञांना वायकिंग युगातील एका महिलेच्या कबरीतून तब्बल १३०० वर्षे जुने कपड्यांचे अवशेष सापडले आहेत. आठव्या शतकातील या महिलेच्या कबरीत आढळलेले कापडाचे बारीक तंतू अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याने या शोधामुळे वायकिंग काळातील पोशाख, विणकाम तंत्र आणि तत्कालीन समाजरचनेचा अभ्यास करण्यास मोठी मदत होणार आहे.

जटलंडमधील आम्लयुक्त मातीमध्ये सामान्यतः कापड आणि नैसर्गिक तंतू नष्ट होतात. मात्र, या कबरीतील धातूच्या दोन ब्रोचने (कपडे जोडण्यासाठी वापरली जाणारी अलंकारिक पिन) कपड्यांचे अवशेष सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. महिलेच्या अंगावरील कपडे जोडण्यासाठी वापरलेल्या ब्रोचला कालांतराने गंज चढला. त्यातून निर्माण झालेले धातूचे क्षार मातीत मिसळले आणि त्यामुळे जीवाणू व बुरशीची वाढ रोखणारे रासायनिक वातावरण तयार झाले. परिणामी, कपड्यांचे तंतू कुजण्यापासून वाचले आणि सुमारे १३ शतकांनंतरही त्यांचे अवशेष संशोधकांना मिळू शकले.

ब्रोचच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंना कपड्यांचे अवशेष आढळले आहेत. त्यामुळे महिलेच्या पोशाखातील बाहेरील तसेच शरीराला लागून असलेल्या आतील थरांचा अभ्यास केला जात आहे. तज्ज्ञांकडून तंतूंची रचना, धाग्यांची गुणवत्ता आणि विणकामाची पद्धत तपासली जात आहे. कपड्यांचा मूळ रंग कोणता होता, हे शोधण्यासाठी विशेष स्पेक्ट्रल विश्लेषणही केले जात आहे. वायकिंग समाजात रंगीत कपडे प्रामुख्याने श्रीमंत किंवा उच्च सामाजिक स्थान असलेल्या व्यक्ती वापरत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या संशोधनातून या महिलेची सामाजिक व आर्थिक स्थितीही समोर येण्याची शक्यता आहे.

कबरीत सापडलेले महिलेचे दातही चांगल्या स्थितीत आहेत. दातांच्या इनॅमलचे समस्थानिक विश्लेषण करून तिचे वय, आहार, आरोग्य आणि बालपणी ती कोणत्या प्रदेशात राहत होती, याचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय एका ब्रोचवर दुरुस्तीचे निशाण आढळले आहे. त्यामुळे तो ब्रोच आधी तुटला होता आणि नंतर दुरुस्त करून वापरण्यात आला असावा, असा अंदाज आहे. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे कपडे आणि दागिने एकाच काळातील आहेत की जुन्या पिढीकडून वारशाने मिळाले होते, हे निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT