Viking Age Treasure | फिनलंडमध्ये सापडला वायकिंग काळातील चांदीचा खजिना 
विश्वसंचार

Viking Age Treasure | फिनलंडमध्ये सापडला वायकिंग काळातील चांदीचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

हेलसिंकी : फिनलंडची राजधानी हेलसिंकीपासून उत्तर दिशेला सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिस्मा जवळील एका जंगलात वायकिंग काळातील चांदीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खजिना सापडला आहे. मेटॅलिक डिटेक्टरच्या साहाय्याने एका व्यक्तीने हा शोध लावला असून या खजिन्यात जवळपास ४.५ किलोग्रॅम (सुमारे १० पाऊंड) वजनाची हजारो चांदीची नाणी आणि दागिने समाविष्ट आहेत.

हा खजिना भूर्जपत्राच्या पात्रांमध्ये दोन वेगळ्या भागांत पुरून ठेवण्यात आला होता. लाहटी ऐतिहासिक संग्रहालयाचे पुरातत्त्‍वशास्त्रज्ञ एस्को टिक्काला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नाण्यांचा आणि दागिन्यांचा काळ बहुधा इसवी सन १००० ते १०५० दरम्यानचा असावा. मात्र, हे दागिने नक्की कोणत्या वर्षी जमिनीखाली गाडले गेले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. हा खजिना अजून पूर्णपणे स्वच्छ, वेगळा आणि मोजलेला नाही. तरीही यामध्ये हजारो वस्तूंचा समावेश असल्याचा अंदाज आहे.

‘या खजिन्यात खूप मोठ्या प्रमाणात नाणी आहेत, ज्यांची तपासणी करण्याचे काम अजून बाकी आहे,’ असे टिक्काला यांनी स्पष्ट केले. ३ सप्टेंबर रोजी काले लापिनेन नावाच्या मेटॅलिक डिटेक्टरिस्टला हे दोन साठे सापडले. त्यांनी तत्काळ संग्रहालयाशी संपर्क साधला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुरातत्त्‍वशास्त्रज्ञांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन केले. हा खजिना जंगलातील एका मोठ्या खडकाजवळ, जमिनीखाली सुमारे ४५ सेंटीमीटर (१८ इंच) खोलीवर आणि एकमेकांपासून १२ मीटर (३९ फूट) अंतरावर दोन दगडांच्या मध्ये गाडलेला होता.

आसपासच्या परिसरात कोणत्याही समाधीचे किंवा दफनाचे अवशेष आढळलेले नाहीत; तथापि, या संपूर्ण परिसराचा सखोल अभ्यास अजून झालेला नाही. गेल्या १० वर्षांत फिनलंडच्या याच भागात इतरही अनेक गाडलेले खजिने सापडले आहेत. इतिहास तज्ज्ञांच्या मते, जुन्या काळात कर चुकवणे, धार्मिक नवस किंवा संकट काळात मालमत्ता सुरक्षित ठेवणे अशा विविध कारणांसाठी लोक आपला खजिना जमिनीखाली लपवून ठेवत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT