‘वायकिंग १’च्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेला पूर्ण झाली ५० वर्षे! Vanessa Jewell
विश्वसंचार

Mars Mission : ‘वायकिंग १’च्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेला पूर्ण झाली ५० वर्षे!

अंतराळ संशोधनातील सुवर्णक्षण

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : हजारो वर्षांपासून मानव उघड्या डोळ्यांनी मंगळ ग्रहाकडे पाहत होता आणि त्याच्या पृष्ठभागावर नक्की काय असेल, याचा विचार करत होता. ‘नासा’च्या ‘वायकिंग १’ या अंतराळयानाने मंगळाच्या लाल मातीवर पाऊल ठेवून तिथली पहिली चित्रे पृथ्वीवर पाठवली आणि या रहस्यावरचा पडदा कायमचा उठला. ही केवळ एका मोहिमेची यशोगाथा नव्हती, तर मानवाने दुसऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावरून पाहिलेले ते पहिलेवहिले दृश्य होते! नासाच्या माहितीनुसार, ‘वायकिंग १’ यानाला लँडिंग झाल्याच्या अवघ्या २५ सेकंदानंतर पहिले छायाचित्र घेण्याचे आदेश (Programmed) देण्यात आले होते. २० जुलै १९७६ रोजी सकाळी ७.५३ वाजता (EDT) यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले. विशेष म्हणजे, अपोलो ११ मोहिमेद्वारे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या बरोबर ७ वर्षांनंतर हा ऐतिहासिक क्षण आला. आता या मोहिमेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच ४ जुलै १९७६ रोजी हे लँडिंग करण्याचे नियोजन होते. परंतु, मंगळावर सुरक्षित आणि सपाट जागा शोधण्यासाठी लँडिंग काही दिवस पुढे ढकलण्यात आले. हे यान मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडील ‘क्रायसे प्लॅनेटिया’ या भागात सुरक्षितपणे उतरले. मात्र, लँडिंग यशस्वी झाल्याचा रेडिओ संदेश पृथ्वीवरील नासाच्या नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मंगळ आणि पृथ्वीमधील ३४ कोटी किलोमीटर (२१२ दशलक्ष मैल) अंतर पार करावे लागले. यासाठी संशोधकांना तब्बल १९ मिनिटे वाट पाहावी लागली.

लँडिंगच्या ४० मिनिटांनंतर नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’ मधील मॉनिटर्सवर पहिले छायाचित्र डावीकडून उजवीकडे, एकामागोमाग एक ओळ करत हळूहळू स्पष्ट होऊ लागले. वायकिंग लँडर इमेजिंग टीमचे प्रमुख डॉ. थॉमस मर्च यांनी त्या अविस्मरणीय क्षणाची आठवण सांगताना म्हटले होते : ‘मी स्क्रीनवरील त्या पहिल्या काही ओळींची वाट पाहत काळ्या पडद्याकडे एकटक पाहत होतो. हळूहळू त्यावर दगड आणि वाळू दिसू लागली... आणि शेवटी उजव्या कोपऱ्यात आपल्या अंतराळयानाचा पाया दिसला! आपल्या या यशावर वास्तवतेची मोहोर उमटवणारी ती एक प्रतीक-कृती होती. मी पुन्हा पुन्हा एकच शब्द उच्चारत होतो...‘हे अद्‌भुत आहे!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT