लंडन : तुम्ही आजवर कपडे, दागिने, सजावटीचे साहित्य, किराणा आणि गाड्यांचे अनेक बाजार पाहिले असतील. पण जगात असाही एक बाजार भरतो जिथे माजी प्रेमी-प्रेमिका (Ex-lovers) अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटतात, हे तुम्हाला माहिती आहे का? या बातमीत आपण अशाच एका बाजाराबद्दल जाणून घेणार आहोत, जो अपूर्ण राहिलेल्या प्रेमाला पुन्हा मिळवून देण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
व्हिएतनामच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात असलेल्या ‘हा गियांग’ प्रांतात ‘खाऊ वाई’ नावाचे एक गाव आहे. हे गाव दरवर्षी एका अनोख्या ‘लव्ह मार्केट’चे आयोजन करते. या बाजारात कपडे, शूज किंवा घरातील सामान विकले जात नाही, तर जुने प्रेमी एकमेकांना भेटण्यासाठी येतात. जगभरात हे ठिकाण ‘खाऊ वाई लव्ह मार्केट’ म्हणून ओळखले जाते. इतकेच नाही तर, २०२१ मध्ये व्हिएतनामच्या संस्कृती मंत्रालयाने ‘खाऊ वाई’ या परंपरेला अधिकृतपणे ‘सांस्कृतिक वारसा’ म्हणून दर्जा दिला होता. या बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथे पती-पत्नी एकत्र येतात आणि मग आपापल्या जुन्या प्रियकर-प्रेयसीला भेटण्यासाठी जातात. विशेष म्हणजे, आपल्या ‘एक्स’ला अशा प्रकारे भेटण्याने जोडीदाराच्या मनात संशय किंवा फसवणुकीची भावना निर्माण होत नाही. आजच्या काळात नात्यांमध्ये संशयाची भावना दुरावा निर्माण करते, तिथे या परंपरेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
आयुष्यात अशी काही नाती असतात ज्यांचा आदर करणे गरजेचे असते, अशी तिथली भावना आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान खाऊ वाई येथे या बाजाराचे आयोजन केले जाते. व्हिएतनामी कॅलेंडरनुसार, तिसऱ्या महिन्याच्या २७ व्या दिवशी हा बाजार भरतो. हा काळ तेथील डोंगराळ भागात वसंतऋतूचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात असा असतो. शेतीची पारंपरिक कामे आटोपल्यानंतर लोक या बाजारात जाण्याचा विचार करतात. हा बाजार शतकानुशतके जुना असून त्याची अधिकृत सुरुवात १९१९ सालापासून झाली असल्याचे मानले जाते.
तेथील लोककथांनुसार, ही कहाणी ‘नुंग’ समाजातील ‘बा’ नावाचा तरुण आणि ‘गियाई’ समाजातील ‘उत’ नावाच्या तरुणीशी जोडलेली आहे. ‘बा’ हा बासरी वाजवणारा एक सामान्य तरुण होता, तर ‘उत’ ही तिथल्या कबिल्याच्या सरदाराची मुलगी होती. भिन्न समाजांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे दोघांनी निर्णय घेतला की, दरवर्षी चंद्र कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याच्या २७ व्या दिवशी ते खाऊ वाई दरीत एकमेकांना भेटतील. तेव्हापासून या बाजाराची परंपरा सुरू झाली ती आजपर्यंत चालत आली आहे.