व्हिएन्ना : शुक्र ग््राहाच्या पृष्ठभागावरील अत्यंत विचित्र आणि महाकाय वर्तुळाकार रचना, ज्यांना ‘कोरोनाई’ म्हटले जाते, त्या आता या ग््राहाच्या अंतर्गत भागातील गूढ उकलण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. जर्मनीच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ फ्रायबर्ग’ येथील पृथ्वी आणि ग््राह शास्त्रज्ञ ॲना गुल्चर यांनी नासाच्या ‘मॅगेलन’ अंतराळ मोहिमेतील जुन्या डेटाचा वापर करून या सर्वात मोठ्या ‘कोरोनाई’चे नावीन्यपूर्ण थीडी मॉडेल्स तयार केले आहेत. यामुळे शुक्राच्या भूगर्भीय हालचाली समजून घेणे सोपे होणार आहे.
ॲना गुल्चर आणि त्यांच्या संघाने नासाच्या ‘मॅगेलन’ अंतराळ मोहिमेतील रडार सेन्सर्सच्या डेटाचा वापर केला आहे. या अंतराळ मोहिमेचे काम अधिकृतपणे 1994 मध्येच थांबले होते. मात्र, या जुन्या डेटाच्या साहाय्याने संशोधकांनी या ‘कोरोनाई’च्या सभोवतालची भूप्रदेश रचना आणि तेथील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या खुणा यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. व्हिएन्ना येथे आयोजित ‘युरोपियन जिओसायन्सेस युनियन’च्या 2026 च्या महासभेत सादर केलेल्या शोधप्रबंधात गुल्चर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नमूद केले आहे की, हे ‘कोरोनाई’ आकार, रचना, भूप्रदेश आणि गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत प्रचंड वैविध्य दाखवतात. याचा अर्थ असा की, हे सर्व केवळ एकाच प्रक्रियेतून तयार झालेले नाहीत, तर त्यामागे विविध प्रकारच्या भूगर्भीय हालचाली कारणीभूत आहेत.
‘संशोधकांनी तयार केलेल्या अद्ययावत डेटाबेसमध्ये शुक्राच्या पृष्ठभागावर पसरलेल्या अशा तब्बल 741 कोरोनाईंचा समावेश आहे. ॲना गुल्चर यांनी सांगितले, ‘हे कोरोनाई म्हणजे खडकांवर पडलेल्या भेगांचे महाकाय वर्तुळाकार जाळे आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर शुक्र ग््राहाच्या पोटातील अत्यंत उष्ण शिलारस जेव्हा वरच्या दिशेने सरकतो, तेव्हा त्याच्या दाबामुळे पृष्ठभागावर तयार झालेल्या या खुणा आहेत.’ शुक्रावरील या रचना समजून घेणे केवळ त्या ग््राहाच्या अंतर्गत हालचाली जाणून घेण्यासाठीच महत्त्वाचे नाही, तर आपल्या सुरुवातीच्या काळातील पृथ्वीवरही अशाच प्रकारच्या काही प्रक्रिया घडल्या होत्या का? हे तपासण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गुरुत्वाकर्षण आणि भूप्रदेशाच्या डेटाची भूगर्भीय सिम्युलेशनशी सांगड घालत, या अभ्यासाने 52 कोरोनाईंच्या खाली उष्ण मॅन्टल वर येत असल्याचे संकेत दिले आहेत. शुक्र ग््राहावर शिलारसाशी संबंधित वेगवेगळ्या भूगर्भीय प्रक्रिया घडत असल्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. गुल्चर यांच्या मते, सध्या उपलब्ध असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या डेटावरून अनेक सक्रिय भूगर्भीय संकेत सुटू शकतात. याचा अर्थ असा की, सध्या आपल्याला जाणवते त्यापेक्षा शुक्र ग््राहावर अंतर्गत हालचाली खूप मोठ्या प्रमाणावर आणि सर्वत्र सुरू असण्याची शक्यता आहे.