रोम :
लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर आपल्याच देशाचा क्रमांक लागतो. त्यामुळे लोकसंख्यावाढ हा आपल्या देशासमोरील काही गंभीर प्रश्नांपैकी एक आहे. मात्र, जगात काही असेही देश आहेत ज्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. अर्थातच या देशांचा आकारही लहान आहे. अशा देशांमध्ये अव्वल स्थानावर आहे व्हॅटिकन सिटी. तेथील लोकसंख्या अवघी 451 आहे!
संयुक्त राष्ट्रसंघाने 'देश' म्हणून मान्यता दिलेला व्हॅटिकन सिटी हा सर्वात छोटा देश आहे. अवघ्या 451 लोकसंख्येचा हा चिमुकला देश असला तरी तो पोपचे निवासस्थान असल्याने जगभरातील ख्रिश्चन लोकांसाठी महत्त्वाचा आहे. तेथील सेंट पीटर्स स्क्वेअर, सिस्टीन चॅपेल आणि अनेक वस्तुसंग्रहालये पाहण्यासाठीही रोज जगभरातील पर्यटक तिथे येत असतात. सर्वात कमी लोकसंख्या असलेला दुसर्या क्रमांकाचा देश म्हणजे तवालू. पॅसिफिक महासागरातील हा देश हवाई आणि ऑस्ट्रलिया दरम्यान आहे. 2012 च्या जनगणनेनुसार तेथील लोकसंख्या 10,640 आहे. सन 2000 मध्ये हा देश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनला. तिसर्या स्थानावर आहे पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरातीलच नौरू हा देश. हा देशही एक बेटच असून त्याची लोकसंख्या 11,347 आहे. जगातील सर्वात दुर्गम देशांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याच्या सर्वात जवळ असलेले बनाबा हे बेटही तीनशे किलोमीटर अंतरावर आहे!