कॅलिफोर्निया : उंट म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर वाळवंटात शांतपणे चालणारा शाकाहारी प्राणी उभा राहतो. मात्र, सुमारे १ कोटी ३० लाख वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेच्या मैदानी प्रदेशात चक्क सुळे असलेला एक महाकाय आणि विचित्र ‘व्हॅम्पायर उंट’ वावरत होता, असा आश्चर्यकारक उलगडा जीवाश्म शास्त्रज्ञांच्या एका नवीन अभ्यासातून झाला आहे. उंच, सडपातळ आणि जिराफासारखी मान असलेल्या या लुप्त झालेल्या उंटाच्या प्रजातीला संशोधकांनी ‘व्हॅम्पायरोकॅमेलस वेल्शी’ असे नाव दिले आहे.
कॅलिफोर्नियातील जीवाश्मशास्त्रज्ञ डोनाल्ड प्रोथेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यूयॉर्कमधील 'अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री'मध्ये संग्रहित असलेल्या हजारो जीवाश्मांचा सखोल अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. सुमारे ४ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी उंटांची उत्पत्ती उत्तर अमेरिकेतच झाली होती. टेक्सास आणि ओक्लाहोमा भागात सापडलेल्या या विशिष्ट उंटाच्या कवटीच्या जीवाश्मांवरून असे दिसून आले की, या प्रजातीतील नरांना पुढच्या बाजूला चाकूसारखे वाकलेले आणि सुमारे ५ सेंटिमीटर लांब तीक्ष्ण सुळे होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या उपदाढाही ब्लेडसारख्या धारदार होत्या.
हा उंट शाकाहारी असूनही त्याला इतके भयानक सुळे का होते, हा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला होता. तत्कालीन उत्तर अमेरिकेत मोठ्या शिकारी मार्जारवंशीय प्राण्यांची संख्या मोठी होती; त्यांच्यापासून स्वसंरक्षण करण्यासाठी या सुळ्यांचा वापर होत असावा. तसेच, या प्रजातीतील केवळ नरांनाच हे सुळे असल्याने, मादीला आकर्षित करण्यासाठी आणि जोडीदारासाठी इतर नरांशी लढताना या तीक्ष्ण दातांचा शस्त्रासारखा वापर केला जात असावा.