मॉस्को : लहानपणी अनेक मुलींची आवडती सोबती म्हणजे सुंदर बार्बी डॉल. तिचे घर, किचन सेट आणि तिचा प्रियकर ‘केन’ या सगळ्या आठवणी अनेकांच्या मनात घर करून आहेत. आजही लहान मुलांसाठी बार्बी डॉल एक उत्तम भेटवस्तू आहे; पण जगात एक अशी व्यक्ती आहे, जी हुबेहूब बार्बी डॉलसारखी दिसते, म्हणूनच तिला ‘मानवी बार्बी डॉल’ म्हणून ओळखले जाते. तिचे नाव आहे व्हॅलेरिया व्हॅलेरिव्हना लुक्यानोव्हा.
युक्रेनियन मॉडेल असलेली व्हॅलेरिया सध्या मॉस्कोमध्ये राहते आणि तिच्या बार्बी डॉलसारख्या दिसण्यामुळे ती जगभरात चर्चेत आली. व्हॅलेरियाने एकदा सांगितले होते की, तिने ब—ेस्ट इम्प्लांट केले आहेत; परंतु तिच्या शरीराचा उर्वरित भाग नैसर्गिक असून, दररोज व्यायाम आणि विशिष्ट आहारामुळे तो सडपातळ आहे. ती सध्या 39 वर्षांची आहे. व्हॅलेरिया वयाच्या 16 व्या वर्षापासून 2014 पर्यंत युक्रेनमधील ओडेसा येथे राहत होती, त्यानंतर ती मॉस्कोला स्थायिक झाली.
2007 मध्ये तिने ‘मिस डायमंड क्राऊन ऑफ द वर्ल्ड’ ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत सुमारे 300 स्पर्धक होते आणि विशेष म्हणजे, यात प्लास्टिक सर्जरी किंवा बॉडी मॉडिफिकेशनला मनाई नव्हती. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व्हॅलेरिया तिच्या बार्बी डॉलसारख्या दिसण्यामुळे प्रसिद्ध झाली. रशियाबाहेरील माध्यमांमध्ये तिची पहिली दखल ‘जेझेबेल’ ब्लॉगवर घेण्यात आली, त्यानंतर ‘व्ही’ मासिकासाठी सेबॅस्टियन फाएनाने तिचे फोटोसेशन केले. माध्यमांनी तिचे वर्णन ‘जिवंत बार्बी डॉल’ असे केले.
व्हॅलेरिया लुक्यानोव्हाने तिचा बालपणीचा मित्र आणि युक्रेनियन उद्योगपती दिमित्री शक्राबोव्हशी लग्न केले आहे. तथापि, व्हॅलेरियाने म्हटले आहे की, तिला मुले नको आहेत किंवा सरधोपट ‘कौटुंबिक जीवनशैली’ नको आहे. व्हॅलेरिया ‘स्कूल ऑफ आऊट-ऑफ-बॉडी ट्रॅव्हल’मध्ये प्रशिक्षक आहे. ही एक आंतरराष्ट्रीय शाळा आहे, जिथे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या भौतिक शरीरातून बाहेर पडून त्यांच्या आध्यात्मिक शरीरात प्रवास कसा करायचा हे शिकवतात. विकिपीडियानुसार, तिचे आध्यात्मिक नाव ‘अमातुए’ आहे. व्हॅलेरियाने ‘अमातुए’ नावाने ‘सन इन द आईज’ आणि ‘2013’ हे दोन न्यू-एज म्युझिक अल्बम रेकॉर्ड केले आहेत. तसेच, तिने ‘अॅस्ट्रल ट्रॅव्हल अमातुए’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. तिने 2017 मध्ये ‘द डॉल’ या हॉरर चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.