न्यूयॉर्क : जागतिक महासत्ता अमेरिकेने पहिल्यावहिल्या पूर्णपणे स्वयंचलित फायटर जेटस्ची रचना पूर्णत्वास नेली असून वायएफक्यू - 42 ए व वायएफक्यू-44 ए अशी त्यांना नावे देण्यात आली आहेत. त्यांना लॉयल विंगमन असेही ओळखले जाणार आहे.
‘आपल्याकडे वायएफक्यू-42 अल्फा आणि वाकएफक्यू-44 अल्फा’मध्ये फायटर डिझिग्नेशन आहे. सध्या हे सर्व काही फक्त प्रतीकात्मक आहे, पण आपण हवाई युद्धाच्या नव्या अध्यायाकडे वळत आहोत, याचेच हे संकेत आहेत, असे एअर फोर्सचे मुख्य जनरल डेव्हिड अल्विन यांनी एअर अँड स्पेस फोर्सेस मॅगझिनला सांगितले. सदर दोन्ही स्वयंचलित फायटर जेटस् तैनात केले जातील, त्यावेळी एफ - 35 आणि एफ - 32 या मनुष्य संचलित विमानांची त्यांच्यावर करडी नजर असेल. प्रारंभिक चाचण्यांमध्ये अशा विमानांना छोट्या मोहिमा सोपवल्या जातील आणि त्यातील यशापयशानुसार, पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, याचाही त्यांनी यात उल्लेख केला.
हे विमान जनरल अॅटॉमिक्ससोबत 42 अ साठी आणि अँड्युरिल इंडस्ट्रीजसोबत 44 अ साठी विकसित करण्यात आले आहेत. अँड्युरिलच्या ‘द फ्युरी’ मध्ये एकच टर्बोफॅन इंजिन आहे आणि ते 650 मैल प्रतितासापर्यंत वेग वाढवू शकते आणि 50,000 फूट उंची गाठू शकते, जनरल अॅटॉमिक्सचे फायटर जेट सिस्टम त्यांच्या विद्यमान एक्सक्यू - 67 ए वर आधारित आहे, जे प्रत्येक मिशनसाठी उपयुक्त ठरू शकते.
‘आपण पुढील जनरेशनसाठी सेमी-ऑटोनोमस फायटर विमान तयार करत आहोत, जी हवाई वर्चस्वात मूलभूत बदल घडवून आणेल, ज्यामुळे अत्यंत सक्षम, मोठ्या प्रमाणावर उत्पादनक्षम, अधिक परवडणारी आणि अधिक स्वायत्त विमान मिळतील,’ असे इंजिनिअरिंग वरिष्ठ उपाध्यक्ष जेसन लेविन यांनी सांगितले. हे प्रोटोटाइप एअर फोर्सच्या नेक्स्ट-जनरेशन एयर डॉमिनन्स प्रोग्रामचा भाग आहेत, ज्यावर एक संकरित मानवी-स्वायत्त फ्लिटवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नवीन प्रोटोटाइप्स हे सध्याच्या फ्लिटच्या तुलनेत तयार करणे आणि राखणे अधिक स्वस्त ठरणार आहे. एअर फोर्सने 500 उच्च-प्रगत फायटरसह प्रत्येक दोन नवीन फायटर जोडण्यासाठी 1,000 विमानं तयार करण्यासाठी 557.1 मिलियन डॉलर्सचा प्रस्ताव दिला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.