वॉशिंग्टन : ‘मंटा रे’ हा एक विशालकाय समुद्री जीव आहे, जो दिसण्यात काहीसा अमेरिकेच्या स्टील्थ बॉम्बर बी-2 विमानासारखा दिसतो. हा मासा त्याच्या मोठ्या त्रिकोणी पंखांसाठी ओळखला जातो. याला ‘डेव्हिल रे’ असेही म्हणतात. कारण त्याच्या डोक्यावर शिंगासारखे पंख असतात.
मंटाचा आकार कोणत्याही मोठ्या माशापेक्षा मोठा, म्हणजेच माशांच्या प्रजातींमध्ये सर्वात मोठा असतो. याची कमाल लांबी 7 मीटर (23 फूट) पेक्षा जास्त असू शकते. रीफ ‘मंटा रे’च्या पंखांचा फैलाव सरासरी सुमारे 11 फूट असतो. तर, विशाल महासागरीय ‘मंटा रे’चा फैलाव 29 फुटांपर्यंत असू शकतो. हे मासे शांत स्वभावाचे असतात आणि सर्वसाधारणपणे त्यांच्यापासून मानवांना कोणताही धोका नसतो. ‘मंटा’चे शरीर हिर्याच्या आकाराचे असते आणि त्याला त्रिकोणी पंख असतात. त्याच्या तोंडासमोर शिंगासारखे पंख असतात, ज्यांना ‘सेफेलिक लोब’ म्हणतात. हे पंख खाद्य घेण्यासाठी पाणी तोंडात घेण्यास मदत करतात.
मंटा रे ‘मोबुलिडे’ कुटुंबातील ‘मोबुला’ प्रजातीशी संबंधित आहे. याच्या दोन मान्यताप्राप्त प्रजाती आहेत : रीफ रे आणि विशाल महासागरीय मंटा रे. मंटा आपले बहुतेक आयुष्य महासागराच्या खोलवर घालवतात. किनार्याजवळ त्यांचे येणे दुर्मीळ असते. ते विशेषतः हिंद-प्रशांत महासागराच्या किनारी प्रदेशात आढळतात. ‘मरीन इकोलॉजी प्रोग्रेस सीरिझ’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, 2022 मध्ये शास्त्रज्ञांना इक्वाडोरच्या किनारपट्टीवर मंटा रे माशांचा एक विशाल समूह दिसला होता.
मानवी गतिविधी आणि हवामान बदलामुळे अनेक प्राण्यांचे अधिवास आक्रसत असताना, त्यांच्या संख्येत वाढ होणे हे शुभ संकेत मानले जाते, ज्यामुळे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सागरी शास्त्रज्ञांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली. मंटा प्रजातीचे मासे अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे असतात. ते भोजन आणि प्रजननासाठी एकत्र येतात, अन्यथा संपूर्ण आयुष्य एकाकी राहतात. वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, ते आत्म-ओळख करू शकतात. मंटा रे माशाच्या या विशिष्ट शारीरिक रचनेची कॉपी अमेरिकेने एका सागरी शस्त्रासारखी केली आहे. यूएस नेव्हीची नवी पाणबुडी ‘मंटा रे’ संरक्षण कंत्राटदार नॉर्थोप ग्रुमनने डिझाईन केली आहे.
अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेली ही विशाल पाणबुडी गेल्या वर्षी जून 2024 मध्ये चुकून गुगल मॅपवर दिसली होती. ‘मंटा रे’चा प्रोटोटाईप कॅलिफोर्नियातील पोर्ट ह्यूनेमी नौदल तळावर उपस्थित होता, नंतर तो एका सामान्य जहाजाने बदलण्यात आला. त्यानंतर, इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये सुरक्षा त्रुटीबद्दल चर्चा रंगली होती. ‘मंटा रे’ने या वर्षाच्या सुरुवातीला पहिली सागरी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि त्यानंतर तिच्या अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत.