वाॅशिंग्टन : राष्ट्रीय सुरक्षा आणि निर्यात नियंत्रणाचा हवाला देत अमेरिकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. अमेरिकन प्रशासनाने आघाडीची एआय कंपनी ‘अँथ्रोपिक’च्या सर्वात प्रगत एआय प्रोग्राम्सवर (अत्याधुनिक मॉडेल्स) परदेशी नागरिक, कर्मचारी आणि कोणत्याही बिगर-अमेरिकन संस्थेच्या वापरासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे.
अमेरिकन सरकारच्या या आदेशानंतर कंपनीने तत्काळ प्रभावाने आपल्या ‘Fable 5’ आणि ‘Mythos 5’ या अत्याधुनिक मॉडेल्सच्या सेवा बंद केल्या आहेत. मात्र, कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, त्यांच्या ‘क्लाऊड’चे इतर सर्व मॉडेल्स नेहमीप्रमाणे काम करत राहतील. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाचे हे पाऊल एका गैरसमजातून पडले असून लवकरच या सेवा पूर्ववत होतील, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. अमेरिकेने निर्यात नियंत्रणांतर्गत अँथ्रोपिक कंपनीसाठी हा नवीन नियम जारी केला आहे. या नियमांनुसार, कंपनीचे परदेशी कर्मचारी, परदेशी नागरिक आणि कोणत्याही गैर-अमेरिकन संस्थेला अँथ्रोपिकच्या प्रगत एआय प्रोग्रामचा वापर करता येणार नाही. अमेरिकन सरकारच्या या निर्णयावर कंपनीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, सरकारच्या या आदेशाचा थेट परिणाम असा झाला आहे की, नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला आमच्या सर्व ग्राहकांसाठी ‘Fable 5’ आणि ‘Mythos 5’ची सेवा तत्काळ बंद करावी लागत आहे. यामध्ये अँथ्रोपिकच्या स्वतःच्या परदेशी कर्मचारीवर्गाचाही समावेश आहे. ‘या आदेशामुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांची आम्ही माफी मागतो. आमचा असा अंदाज आहे की, हा सरकारचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही लवकरच सरकारचा हा गैरसमज दूर करू आणि पुन्हा एकदा सेवा सुरू करू,’ असे अँथ्रोपिक कंपनीने म्हटले आहे.
अँथ्रोपिकचे ‘मिथोस’ मॉडेल का आहे चर्चेत?
अँथ्रोपिक कंपनीने नुकतेच ‘मिथोस एआय’ (Mythos AI) दर्जाचे प्रगत एआय मॉडेल लाँच केले आहे. विशेष म्हणजे, याचा ॲक्सेस सामान्य लोकांनाही मिळणार होता. मिथोसच्या लाँचिंगदरम्यान कंपनीने सांगितले होते की, हे मॉडेल प्रामुख्याने सरकारी संस्था आणि काही निवडक कंपन्यांसाठी तयार करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, मिथोसला विशेषतः सायबर सिक्युरिटी (सायबर सुरक्षा) आणि जटिल सॉफ्टवेअर कोडचा शोध घेण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.