US Patent | अमेरिकेतही आहे गोमूत्राच्या औषधी गुणधर्माबाबतचे पेटंट 
विश्वसंचार

US Patent | अमेरिकेतही आहे गोमूत्राच्या औषधी गुणधर्माबाबतचे पेटंट

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : गायीच्या मूत्राला भारतात अत्यंत पवित्र मानले जाते. विविध भागांत याला ‘गोमूत्र’ किंवा ‘कामधेनू अर्क’ या नावाने ओळखले जाते. गोमूत्रामध्ये आरोग्यासाठी अनेक फायदेशीर गुणधर्म असतात, अशी भारतात प्राचीन काळापासून मान्यता आहे. या विषयावर अनेकदा वादविवाद होत असले, तरी तुम्हाला हे माहिती आहे का की, गोमूत्रातील औषधी गुणांसाठी अमेरिकेत पेटंटसुद्धा मिळालेले आहे?

शास्त्रज्ञांना गोमूत्रामध्ये असे काही घटक आढळले आहेत, जे मानवी शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. ‘एनसीबीआय’ (NCBI) वर उपलब्ध असलेल्या संशोधनानुसार, आयुर्वेदात गोमूत्राला ‘कामधेनू अर्क’ म्हटले गेले आहे. ‘सुश्रुत संहिता’ आणि ‘अष्टांग संग्रह’ यासारख्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये गोमूत्राच्या विविध औषधी गुणधर्मांचे सविस्तर वर्णन आढळते. सर्व प्राण्यांच्या मूत्रात गोमूत्राला सर्वोत्तम मानले गेले असून, आयुर्वेदात याला ‘संजीवनी’ आणि ‘अमृत’ अशीही उपमा दिली गेली आहे. भारतातील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ (CSIR) ने गोमूत्राचे पेटंट अमेरिकेत नोंदवले आहे. सन २००२ मध्ये यूएस पेटंट क्रमांक ६४,१०,०५९ आणि ६८,९६,९०७ हे ‘काऊ युरिन डिस्टिलेट’च्या (गोमूत्र अर्क) बायो-एन्हान्सर, अँटिबायोटिक, अँटिफंगल आणि अँटिकॅन्सर गुणधर्मांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. बायो-एन्हान्सर गुणधर्म : भारतीय संशोधक आणि शास्त्रज्ञांना गोमूत्र अर्कामध्ये बायो-एन्हान्सर गुणधर्म आढळले आहेत.

याचा अर्थ असा की, जेव्हा हे अँटिबायोटिक्स, अँटिमायक्रोबियल किंवा कॅन्सररोधी औषधांमध्ये मिसळले जाते, तेव्हा त्या औषधांची शरीरातील कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढते आणि रुग्णाला जलद आराम मिळतो. संशोधनानुसार, शुद्ध गोमूत्र हे कोणतेही विषारी द्रव्य (toxin) नसून, त्यात पाणी, युरिया, खनिजे, क्षार, संप्रेरके (hormones) आणि एंझाईम्स असतात. डिस्टिलेशन (बाष्पीभवन आणि स्रावण) प्रक्रियेद्वारे जेव्हा गोमूत्राची वाफ करून ते शुद्ध केले जाते, तेव्हा त्यातील अशुद्धी निघून जाते. यानंतर तयार होणाऱ्या शुद्ध द्रवाला ‘काऊ युरिन डिस्टिलेट’ (गोमूत्र अर्क) म्हटले जाते, जे सामान्य गोमूत्रापेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी यावर एक स्पष्ट आणि गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणतात, ‘जरी या पेटंटमुळे गोमूत्राच्या आयुर्वेदिक महत्त्वाला जागतिक ओळख मिळाली असली, तरीही सर्वसामान्य लोकांनी थेट किंवा प्रक्रिया न केलेल्या गोमूत्राचा वापर करू नये. वैद्यकीय चाचण्या न झालेले, प्रक्रिया न केलेले गोमूत्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा स्वतःच्या मनाने औषध म्हणून पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT