वॉशिंग्टन : सौरमालिकेतील पाहण्यास सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या दूरवरच्या बर्फाळ महाग्रहांपैकी एक असलेला युरेनस बुधवारी (२५ नोव्हेंबर) आपल्या वार्षिक ‘अपोजिशन’(opposition - सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूस येणे) स्थितीत पोहोचला. ‘बीव्हर सुपरमून’नंतर अवघ्या एका दिवसात ही खगोलीय घटना घडली. सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेल्या या ग्रहाला पाहण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे; मात्र तो शोधण्यासाठी स्टारगेझिंग दुर्बीण किंवा चांगल्या दर्जाची टेलिस्कोप वापरणे आवश्यक ठरेल.
युरेनस हा ग्रह अंधुक आणि संथ गतीने फिरणारा असल्याने सर्वसामान्य खगोलप्रेमींकडून त्याकडे क्वचितच लक्ष दिले जाते. मात्र, २५ नोव्हेंबरनंतर पुढील काही आठवड्यांत तो या वर्षातील पृथ्वीच्या सर्वात जवळच्या अंतरावर असेल आणि सर्वात तेजस्वी दिसेल, ज्यामुळे त्याचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. पृथ्वी जेव्हा युरेनस आणि सूर्य यांच्यामधून जाते, तेव्हा युरेनस सूर्याच्या ‘विरुद्ध’ दिशेला येतो; यालाच ‘अपोजिशन’ म्हणतात. ‘अर्थस्काय’ च्या माहितीनुसार, अपोजिशनचा नेमका क्षण २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता (ET) आला. त्यामुळे युरेनस सूर्यास्ताच्या सुमारास पूर्वेला उगवेल, मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात सर्वोच्च बिंदूवर पोहोचेल आणि सूर्योदयाच्या सुमारास पश्चिमेला मावळेल.
हा ग्रह वृषभ तारकासमूहात, ‘प्लेअडीज’ या मुक्त तारागुच्छाजवळ दिसेल. या तारागुच्छाला ‘सेव्हन सिस्टर्स’ किंवा ‘M45’ असेही ओळखले जाते. प्लेअडीज तारागुच्छाच्या आग्नेयेला काही अंशांवर, प्लेअडीज आणि वृषभ तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा ‘अल्डेबारन’ यांच्यातील अंदाजे दोन-पंचमांश अंतरावर युरेनस एका अंधुक प्रकाशबिंदूसारखा दिसेल. +५.६ दृश्यप्रतीसह (magnitude) अत्यंत गडद आकाशात युरेनस तांत्रिकदृष्ट्या उघड्या डोळ्यांनीही दिसू शकतो; तथापि, दुर्बीण किंवा टेलिस्कोपमुळे तो शोधणे अधिक सोपे होते. अपोजिशनच्या वेळी युरेनस पृथ्वीपासून १८.४ खगोलीय एकके (AU) - म्हणजेच सुमारे १.७ अब्ज मैल (२.७ अब्ज किलोमीटर) अंतरावर असेल. टेलिस्कोपमधून पाहिल्यास तो एका लहान निळसर-हिरव्या तबकडीसारखा दिसतो.