वॉशिंग्टन : नवीन संशोधनानुसार, युरेनसवरील दिवसाची लांबी पूर्वीच्या अंदाजापेक्षा सुमारे अर्धा मिनीट जास्त आहे. हबल स्पेस टेलिस्कोपने 11 वर्षांत घेतलेल्या निरीक्षणांचा अभ्यास केल्यावर समोर आले आहे की, युरेनसवरील एक दिवस 17 तास, 14 मिनिटे आणि 52 सेकंदांचा असतो. ही वेळ 1986 मध्ये नासाच्या व्हॉयेजर 2 अंतराळयानाने दिलेल्या अंदाजापेक्षा 28 सेकंदांनी अधिक आहे. याबाबतची माहिती 7 एप्रिल रोजी ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सुमारे 40 वर्षांपूर्वी, ‘व्हॉयेजर 2’ हे युरेनसच्या जवळ जाणारे पहिले अंतराळयान होते. त्याने ग्रहाच्या प्रकाशवृत्तीय (ऑरोरा) रेडिओ सिग्नल्स आणि चुंबकीय क्षेत्राचे डेटा वापरून युरेनसच्या दिवसाची लांबी 17 तास, 14 मिनिटे आणि 24 सेकंद असल्याचे ठरवले होते. त्यावेळी मिळालेला हा अंदाज सुमारे 36 सेकंदांची अनिश्चितता घेऊन होता, जी कालांतराने अधिकाधिक वाढत गेली आणि युरेनसच्या चुंबकीय अक्षाचा नेमका कल ठरवणे कठीण झाले. नवीन अभ्यासासाठी, संशोधकांनी 2011 ते 2022 दरम्यान हबलने घेतलेल्या सहा निरीक्षणांमधून युरेनसच्या चुंबकीय ध्रुवांवरील ऑरोराच्या हालचालींचा मागोवा घेतला. या डेटावरून त्यांनी ग्रहाच्या चुंबकीय ध्रुवांचे स्थान अधिक अचूकपणे निश्चित केले आणि त्यातून युरेनसच्या परिभ्रमण कालावधीचा अधिक अचूक अंदाज लावता आला. या नव्या मापनात अनिश्चितता 0.04 सेकंदांपेक्षा कमी आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. ‘हबलने सातत्याने केलेली निरीक्षणे अत्यावश्यक होती,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि पॅरिस वेधशाळेचे खगोलशास्त्रज्ञ लॉरेंट लामी यांनी एका निवेदनात सांगितले. ‘इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा नसता, तर आम्हाला हवे असलेले अचूक परिणाम मिळवणे अशक्य झाले असते.‘ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ टिम बेडिंग म्हणाले, ‘ही वेळ काही फार बदललेली नाही, पण ती आता इतकी अचूक आहे की वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून अधिक उपयोगी ठरू शकते.’