पाटणा : नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन रिसर्चमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासानुसार, 40 स्तनपान देणार्या मातांच्या ब्रेस्ट मिल्क सँपलमध्ये युरेनियमचे प्रमाण अत्यंत उच्च आढळले. हा रिसर्च पाटणा येथील महावीर कॅन्सर संस्थेतील डॉ. अरुण कुमार आणि प्रो. अशोक घोष यांनी एम्स, नवी दिल्ली येथील बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमसह केला.
ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान केलेल्या संशोधनात भोजपूर, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, कटिहार आणि नालंदा येथील 17 ते 35 वयोगटातील 40 महिलांच्या ब्रेस्ट मिल्क सँपलचे विश्लेषण केले गेले. सर्व नमुन्यांमध्ये युरेनियम (यु-238) आढळून आले, ज्याचे प्रमाण 0 ते 5.25 ग्रॅ./ली. पर्यंत होते.
खगरियामध्ये सरासरी पातळी सर्वाधिक आढळली, नालंदामध्ये सर्वात कमी आणि कटिहारमधील एका सँपलमध्ये सर्वाधिक होती. जवळजवळ 70 टक्के बाळे याच्या संपर्कात आली, ज्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. एम्सचे सह-लेखक डॉ. अशोक शर्मा म्हणाले की, युरेनियमचा सोर्स अद्याप अस्पष्ट आहे. युरेनियम कुठून येत आहे हे आम्हाला अद्याप माहीत नाही. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण देखील याची चौकशी करत आहे.
दुर्दैवाने, युरेनियम फूड चेनमध्ये प्रवेश करतो आणि कॅन्सर, न्यूरोलॉजिकल समस्या आणि मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम घडवतो, जो खूप मोठा चिंतेचा विषय आहे. ब्रेस्ट मिल्कमधील युरेनियमची उपस्थिती दर्शवते की, प्रदूषणामुळे हे झाले आहे. लहान मुले युरेनियमबद्दल विशेषतः संवेदनशील असतात. कारण, त्यांचे अवयव अजूनही विकसित होत असतात, ते अधिक विषारी धातू शोषून घेतात, युरेनियम किडनीला नुकसान पोहोचवते, न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण करते आणि नंतरच्या आयुष्यात कॅन्सरचा धोका वाढवू शकते.