विश्वसंचार

एक होते आर्गोलँड!

Arun Patil

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी आता आर्गोलँड नावाच्या एका लुप्त झालेल्या महाद्विपाच्या रहस्याचा खुलासा केला आहे. हा प्राचीन भूभाग 15.5 कोटी वर्षांपूर्वी पश्चिम ऑस्ट्रेलियापासून वेगळा झाला होता. तो आग्नेय आशियाच्या दिशेने सरकत असताना लुप्त झाला. आता नव्या संशोधनामध्ये दिसून आले आहे की हे आर्गोलँड अचानक गायब झाले नाही. टेक्टॉनिक शक्तींमुळे त्याच्यामध्ये ताण निर्माण झाला व तो तुटून वेगळा झाला. त्याचे अवशेष संपूर्ण दक्षिण आशियामध्ये फैलावले.

यापूर्वी सध्याचे न्यूझीलंड ज्याचा एक भाग आहे अशा 'झिलँडिया' या समुद्रात बुडालेल्या खंडाची माहिती समोर आली होती. आता संशोधकांनी ऑस्ट्रेलियापासून अलग झालेल्या या भूखंडाची माहिती समोर आणली आहे. सुमारे 15.5 कोटी वर्षांपूर्वी हा भूखंड ऑस्ट्रेलियापासून वेगळा झाला होता. त्याच्याशी निगडीत पुरावे ऑस्ट्रेलियाच्या वायव्य तटावरील खोल सागरी बेसिन अर्गो एबिसल मैदानात आढळले आहेत. भारतीय उपखंड हा 12 कोटी वर्षांपूर्वी सुपरकाँटिनंट (तत्कालीन एकच महाखंड) असलेल्या गोंडवानापासून वेगळा झाला होता, जो आजही अस्तित्वात आहे.

मात्र, आर्गोलँडबाबत असे घडले नाही. तो अनेक तुकड्यांमध्ये तुटून विखुरला गेला. त्याचे वेगवेगळे तुकडे कुठे गेले याबाबत संशोधकांना आजही कुतुहल आहे. नेदरलँडच्या युट्रेक्ट विद्यापीठातील संशोधक एल्डर एडवोकाट यांनी सांगितले की आम्हाला हा खंड ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस कुठे तरी असेल हे ठाऊक होते. त्यामुळे आम्ही आग्नेय आशियामध्ये तो आढळेल अशी आशा होती. 'गोंडवाना रिसर्च जर्नल'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार संशोधकांना इंडोनेशिया आणि म्यानमारच्या आसपास विखुरलेले प्राचीन भूमीचे तुकडे सापडले. हे तुकडे प्राचीन आर्गोलँडचेच होते.

SCROLL FOR NEXT