फ्लोरिडा/वॉशिंग्टन : अंतराळ संशोधनातील सर्वात सुरक्षित आणि निर्जंतुक मानल्या जाणाऱ्या नासाच्या क्लीनरूममध्ये शास्त्रज्ञांना 26 नवीन प्रजातींचे जीवाणू (बॅक्टेरिया) आढळले आहेत. विशेष म्हणजे, या प्रजाती पृथ्वीवरील विज्ञानाला आतापर्यंत पूर्णपणे अज्ञात होत्या. या शोधामुळे अंतराळ मोहिमांच्या प्लॅनेटरी प्रोटेक्शन नियमावलीबद्दल शास्त्रज्ञांनी गंभीर चिंता व्यक्तकेली आहे.
काय आहे हे संशोधन?
नासाच्या ज्या ठिकाणी फिनिक्स मार्स लँडर तयार करण्यात आले होते, त्या अत्यंत सुरक्षित प्रयोगशाळेतील जमिनीवर 2007 मध्ये हे नमुने गोळा करण्यात आले होते. मात्र, तेव्हाच्या तंत्रज्ञानामुळे त्यांची ओळख पटवता आली नव्हती. आता आधुनिक डीएनए तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांचे विश्लेषण केले असता, हे 26 जीवाणू पूर्णपणे नवीन असल्याचे सिद्ध झाले आहे.
अत्यंत कठोर वातावरणातही जगले
क्लीनरूम ही अशी जागा असते जिथे हवा सतत गाळली (फिल्टर) जाते, तापमान आणि आर्द्रता अत्यंत काटेकोरपणे नियंत्रित केली जाते आणि जमिनीवर सतत जंतुनाशकांचा वापर होतो. तरीही हे जीवाणू तेथे जगले.
विशेष गुणधर्म
संशोधकांना असे आढळले की, या जीवाणूंमध्ये किरणोत्सर्ग (रेडिएशन) सहन करण्याची आणि स्वतःचा डीएनए दुरुस्त करण्याची विलक्षण क्षमता देणारी जनुके आहेत.
जीवाणूंचा धोका काय?
जर हे जीवाणू पृथ्वीवरच्या प्रगत प्रयोगशाळेत जगू शकतात, तर ते अंतराळ यानावर बसून दुसऱ्या ग्रहावर (उदा. मंगळावर) पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्व काही पुन्हा तपासण्याची वेळ
सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे (केएयूएसटी) प्राध्यापक अलेक्झांडर रोसाडो म्हणाले, “हा आमच्यासाठी सर्व काही थांबवून पुन्हा तपासण्याचा क्षण होता. हे नवीन जीवाणू दुर्मीळ असले तरी ते अशा कठोर वातावरणातही तग धरू शकतात हे सिद्ध झाले आहे.”
जीवाणू मंगळावर जगू शकतील का?
हे जीवाणू अंतराळातील निर्वात पोकळी (व्हॅक्यूम), प्रचंड थंडी आणि अतिनील किरणे (अल्ट्रा व्हायोलेट रेज) सहन करून मंगळाच्या पृष्ठभागावर जिवंत राहू शकतात का, याची चाचणी 2026 च्या सुरुवातीला एका प्लॅनेटरी सिम्युलेशन चेंबरमध्ये केली जाणार आहे.