universe expansion rate | ब्रह्मांड विस्ताराच्या वेगावरून खगोलशास्त्रज्ञांमध्ये संभ्रम 
विश्वसंचार

universe expansion rate | ब्रह्मांड विस्ताराच्या वेगावरून खगोलशास्त्रज्ञांमध्ये संभ्रम

विज्ञानाच्या ‘प्रमाणित मॉडेल’समोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अवकाश विज्ञानात सध्या एक मोठे संकट निर्माण झाले आहे, ज्याला शास्त्रज्ञ ‘हबल टेन्शन’ म्हणत आहेत. ब्रह्मांडाच्या विस्ताराचा वेग मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधून वेगवेगळी उत्तरे येत असल्याने, आपल्या सध्याच्या विज्ञानाच्या मूलभूत समजावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 10 एप्रिल रोजी ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार, ही तफावत केवळ मानवी चूक नसून ती विश्वाच्या उत्पत्तीच्या नव्या सिद्धांतांकडे निर्देश करत आहे.

खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मांडाच्या विस्ताराचा वेग, ज्याला ‘हबल कॉन्स्टंट’ म्हटले जाते, तो दोन मुख्य पद्धतींनी मोजतात: 1. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड ( CMB)) : ही पद्धत ‘बिग बँग’नंतर (ब्रह्मांडनिर्मितीच्या महास्फोटानंतर) अवघ्या 3,80,000 वर्षांनी पसरलेल्या सर्वात जुन्या प्रकाशाचा अभ्यास करते. यावरून हबल कॉन्स्टंटचे मूल्य प्रतिसेकंद 67 ते 68 किलोमीटर प्रति मेगापार्सेक इतके येते. 2. स्थानिक विश्वाचे निरीक्षण ( Standard Candles): दुसरी पद्धत आपल्या जवळच्या तार्‍यांच्या प्रकाशाचा अभ्यास करते.

या निरीक्षणांनुसार हे मूल्य अंदाजे 73 किलोमीटर प्रति सेकंद प्रति मेगापार्सेक इतके येते. (नोंद: एक मेगापार्सेक म्हणजे सुमारे 32.6 लाख प्रकाशवर्षे.) ‘हबल टेन्शन’ आणि त्याचे महत्त्व जरी हा फरक पाहताना छोटा वाटत असला, तरी तो केवळ सांख्यिकीय अनिश्चिततेमुळे असू शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. या फरकामुळेच ‘हबल टेन्शन’ची स्थिती निर्माण झाली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे एक मोठे संमेलन भरवण्यात आले होते. संशोधकांनी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डेटाचे विश्लेषण करून आतापर्यंतचे सर्वात अचूक मूल्य काढले, तरीही हा विरोधाभास कायम असल्याचे दिसून आले. याचा अर्थ असा होतो की, विश्वाचे कार्य समजून घेण्यासाठी आपण जे ‘स्टँडर्ड कॉस्मॉलॉजिकल मॉडेल’ वापरतो, ते अपूर्ण आहे.

या अभ्यासाचे सह-लेखक आणि गॉटिंगेन विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड अँडरसन यांनी सांगितले की, ‘हबल टेन्शन इतके मनोरंजक असण्याचे कारण हेच आहे की, सुरुवातीच्या विश्वातील मूल्य आणि सध्याच्या स्थानिक विश्वातील मूल्य यांची तुलना केल्यास, मूलभूत विज्ञानाच्या स्तरावर काहीतरी मोठी त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. यातून हे कळते की विश्वाच्या रचनेमध्ये अजूनही काहीतरी अज्ञात घटक शिल्लक आहे.’ या नवीन संशोधनामुळे शास्त्रज्ञांना आता ब्रह्मांडाचे नियम पुन्हा एकदा तपासावे लागणार असून, भौतिकशास्त्रातील नवीन संकल्पनांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT